वाकड:- वाकड येथे कार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे घेऊन पाळलेल्या चोरट्याला वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी पाठलाग करून पकडले. ही घटना मंगळवारी (दि.२२) पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.
अरबाज उर्फ लाला इरफान शेख (२३, कोंढवा बुद्रुक, पुणे) याला पाठलाग करून पकडले असून त्याचा साथीदार राजू उर्फ सत्यम वीरबहादूर सिंग (२४, घोरपडी पेठ, पुणे) याचा शोध घेऊन अवघ्या काही तासात अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुरेश महादेव जाधव (३४, काळेवाडी) हे वाकड पोलीस ठाण्यात आले. ते ग्लोबल पंजाब हॉटेल वाकड येथे पॅसेंजर घेण्यासाठी थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून ३१०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांनी जाधव यांच्या कार मधून आरोपींचा शोध सुरु केला. ते आरोपी दत्त मंदिर रोड वर आरोपी दिसले.
पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. काळा खडक येथे आल्यानंतर आरोपींच्या दुचाकीला कार आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर देखील आरोपी पळून जात असताना इम्रान सय्यद यांनी पाठलाग करून अरबाज शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त केला. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. मात्र अवघ्या काही तासात त्याला देखील वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद आणि विक्रम भगत यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता गायकवाड उपस्थित होते.