news
Home पिंपरी चिंचवड वेंगसरकर अकादमीतील साडे आठ कोटींच्या दिव्यांचा घोटाळा? चौकशीची मागणी!

वेंगसरकर अकादमीतील साडे आठ कोटींच्या दिव्यांचा घोटाळा? चौकशीची मागणी!

गरज नसताना खर्च; तत्कालीन आणि विद्यमान अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी (मॅक्स मंथन डेली न्यूज): थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये साडे आठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्कालीन आणि विद्यमान विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

रमेश वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, थेरगाव येथील वेंगसरकर अकादमीत महापालिकेच्या विद्युत विभागाने सुमारे साडे आठ कोटी रुपये खर्चून हाय मास्ट एल.ई.डी. दिवे बसवले आहेत. वाघेरे यांच्या म्हणण्यानुसार, या स्टेडियमवर राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट सामने खेळले जात नसताना एवढा खर्च करण्याची गरज नव्हती. हे केवळ खेळाडूंना प्रशिक्षणासाठी वापरले जाते.

त्यांनी असाही आरोप केला आहे की, दिवे बसवण्यासाठी उभारण्यात आलेल्या प्रत्येक खांबासाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च करण्यात आले, म्हणजेच चार खांबांसाठी तब्बल ४८ लाख रुपये खर्च झाले. काही दिवसांपूर्वी दिलीप वेंगसरकर यांनी अकादमीला भेट दिली असता, त्यांना निकृष्ट दर्जाचे दिवे बसवल्याचे निदर्शनास आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील संपूर्ण विद्युत व्यवस्थेचा खर्च केवळ ६ कोटी रुपये असून ती यापेक्षा चांगली असल्याचं मत वेंगसरकर यांनी व्यक्त केल्याचं वाघेरे यांनी सांगितलं.

वाघेरे यांनी पुढे म्हटले आहे की, थेरगाव येथील क्रिकेट ग्राउंड वेंगसरकर अकादमीने भाडेतत्त्वावर घेतले आहे, त्यामुळे या दिव्यांचा खर्च अकादमीने करणे अपेक्षित होते. मात्र, विद्युत विभागातील तत्कालीन सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले आणि विद्यमान सहशहर अभियंता संजय खाबडे यांच्यामुळे हा अनावश्यक खर्च महापालिकेच्या माथी मारण्यात आला आहे. हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केला असल्याचा आरोप वाघेरे यांनी केला आहे.

त्यामुळे, रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून बाबासाहेब गलबले आणि संजय खाबडे यांच्या पगारातून आणि मालमत्तेतून हे पैसे वसूल करण्याची मागणी केली आहे. जर महापालिकेने या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय, दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालये आणि राज्य माहिती आयुक्त कार्यालयाकडेही पाठवण्यात आल्या आहेत.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!