शिवशाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त चाळीसगावात अभिवादन सभा उत्साहात संपन्न!
चाळीसगाव (जळगाव) प्रतिनिधी , दि. २४ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चाळीसगाव (जळगाव): २४ सप्टेंबर हा ऐतिहासिक दुहेरी क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. इ.स. १६७४ मध्ये याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक झाला, तर बरोबर १९९ वर्षांनी म्हणजेच १८७३ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. या दोन्ही ऐतिहासिक घटनांच्या अनुक्रमे ३५२ व्या आणि १५३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघाच्या वतीने चाळीसगाव-भडगाव रोड येथील महात्मा फुले स्मारकात भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ वंदनेने झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सत्यशोधक समाजाचा झेंडा हाती घेऊन ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय जोती, जय क्रांती, जय सत्यशोधक’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते झालेला शाक्त राज्याभिषेक हा बहुजन समाजाला स्वराज्यात सामावून घेणारा क्रांतिकारी प्रयोग होता. स्वराज्य हे सर्व १८ पगड जातींचे आहे, हाच संदेश यातून मिळाला. याच वैचारिक वारशाचा विस्तार महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केला. महात्मा फुले हे शिवरायांचे खरे वैचारिक वारसदार असून त्यांनीच प्रथम रायगडावर जाऊन शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.”
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोकूळ पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या शोषणाचा पर्दाफाश केला होता. आजच्या काळातही शेतकऱ्यांची स्थिती फारशी वेगळी नाही. शिवरायांचे रयतेचे राज्य आणि महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचारच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देऊ शकतात.”
या अभिवादन सभेचे प्रभावी सूत्रसंचालन सत्यशोधक समाजाचे प्रचारक ह.भ.प. भगवान महाराज रोकडे यांनी केले, तर सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष भीमराव खलाने यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता सत्यशोधक समाजाच्या ‘सत्य सर्वांचे घर, सर्व धर्माचे माहेर’ या प्रार्थनेने झाली.
या प्रसंगी माळी समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक खलाने, डॉ. संजय माळी, समता सैनिक सतीश महाजन सर, माजी सरपंच आबासाहेब पैलवान, सच्चिदानंद जाधव, पोलीस पाटील शरद महाजन, एन.डी. महाजन सर, पत्रकार निलेश परदेशी, ‘लोकमत’चे पत्रकार गोविंद वाघ, मानव मुक्ती मिशनचे तालुका अध्यक्ष भूषण माळी, भगवान महाजन, शैलेंद्र महाजन, माजी सैनिक अशोक माळी यांच्यासह चाळीसगाव शहर व तालुक्यातील विविध परिवर्तनवादी संघटनांचे आणि सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी गावागावात शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
