32

पिंपळे सौदागरमधील ‘साई मेरीगोल्ड सोसायटी’त फ्लॅटला भीषण आग; गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या सतर्कतेने अनर्थ टळला!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ९ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपळे सौदागर येथील ‘साई मेरीगोल्ड सोसायटी’ मधील ए-७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. बाल्कनीतून सुरू झालेली ही आग काही वेळातच घरातील इन्व्हर्टर बॅटरी, एसी, टीव्ही आणि इतर साहित्यापर्यंत पसरली. विशेष म्हणजे, या आगीदरम्यान घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसरात एकच तणाव निर्माण झाला होता.
मात्र, घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अत्यंत तातडीने घटनास्थळी धाव घेत जिगरबाजपणे बचावकार्य राबवले. जवानांनी इमारतीमधील नागरिकांची सुखरूप सुटका करत पाण्याचा मारा करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणीही जखमी झालेले नाही.
प्राप्त माहितीनुसार, आगीचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाल्कनीतून पसरलेल्या या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे एसी कॉम्प्रेसर, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरी, घरातील विद्युत वायरिंग आणि इतर मौल्यवान साहित्याचे मोठे नुकसान झाले.
घटनेची वर्दी मिळताच रहाटणी उप अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नेहरूनगर अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्राच्या पथकांचीही तातडीने मदत मागवण्यात आली. अग्निशमन जवानांनी होजपाईपच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग विझवली. आग पूर्णपणे विझविल्यानंतर परिसरात कोणताही धोका उरलेला नाही, याची खात्री करून जवानांनी सुटकेचा श्वास सोडला.
सणासुदीच्या आणि थंडीच्या दिवसांत घरगुती गॅस सिलिंडर व विद्युत उपकरणांचा वापर करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे. गॅस गळतीचा संशय आल्यास घरातील कोणतेही विद्युत स्विच सुरू किंवा बंद करू नका. आग किंवा ठिणगी निर्माण होईल अशी कोणतीही कृती टाळावी. गॅस सिलिंडरचा मुख्य व्हॉल्व्ह सुरक्षितपणे बंद करून त्वरित दरवाजे व खिडक्या उघडाव्यात. आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने अग्निशमन विभागाच्या १०१ किंवा ७०३०१०८९९१ (मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी) या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
