‘रौप्यकन्या शौर्या’चे क्रीडामंत्र्यांकडून कौतुक! आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्समध्ये देशासाठी रौप्य
ठाण्याच्या शौर्या अंबुरेने १३.७३ सेकंदात पूर्ण केली १०० मीटर हर्डल्स शर्यत; क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले अभिनंदन
ठाणे, दि. १ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची आणि ठाणे जिल्ह्याची कन्या शौर्या अंबुरे हिने चमकदार कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. शौर्याने १०० मीटर हर्डल्स शर्यतीत १३.७३ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक (Silver Medal) पटकावले आहे.
शौर्या अंबुरे हिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच, त्यांनी अंबुरे कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधत त्यांचेही अभिनंदन केले आणि शौर्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठाण्याची शौर्या अंबुरे हिने महाराष्ट्राचा क्रीडागौरव वाढविला आहे. मुंबई विमानतळावर तिचे आगमन होताच, क्रीडामंत्री ॲड. कोकाटे यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागाच्या वतीने तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शौर्याच्या या यशाने महाराष्ट्रातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.



