“निसर्गरक्षण हीच खरी देशसेवा!”
नवोदित वनरक्षक व वनपालांना माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवईंचा हृदयस्पर्शी संदेश; एका मातृहृदयाच्या शब्दांनी वन प्रशिक्षण संस्था भारावून
२७ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिखलदरा – “पर्यावरण, जंगल आणि वन्य प्राणी ही केवळ संपत्ती नाहीत; ते आपल्या अस्तित्वाचे प्राण आहेत. त्यांचे रक्षण करणे म्हणजे राष्ट्राची खरी सेवा,” अशा हृदयस्पर्शी शब्दांत माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांनी नवोदित वनरक्षक आणि वनपालांना आवाहन केले. त्यांच्या शब्दांनी वन प्रशिक्षण संस्थेतील प्रत्येक तरुण प्रशिक्षार्थीच्या मनात निसर्गरक्षणाची नवी शपथ रुजली.
मातृहृदयाचा आशीर्वाद आणि प्रेरणेचा झरा
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री असलेल्या डॉ. कमलताई गवई यांनी आज सकाळी ११ वाजता वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या प्रत्येक शब्दात ममतेची, करुणेची आणि प्रेरणेची भावना ओसंडून वाहत होती. कार्यक्रमाची सुरुवात वड वृक्षाचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर, त्यांनी वन प्रशिक्षणार्थींशी भावनिक संवाद साधला.
डॉ. गवई म्हणाल्या, “तुम्ही निवडलेला वन सेवेचा मार्ग खडतर असला तरी, जर तुम्ही त्यात सेवेचा भाव जोडला, तर तुमचा मार्ग सोपा होईल.” त्यांनी आपल्या स्वतःच्या वृक्षारोपणाच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, “तुम्ही निवडलेली निसर्गसेवेची संधी प्रत्येकाला मिळत नाही.”

‘संकटांवर रडण्यापेक्षा मार्ग काढा’
यावेळी डॉ. गवई यांनी आपल्या मुलाचे उदाहरण देत सांगितले, “माझा मुलगा भूषण गवई भारताचा सरन्यायाधीश असून, तो अनेक समाजोपयोगी आणि धडाडीचे निर्णय घेत आहे, त्याच्या हातून देशसेवा घडत आहे हे पाहून मला आनंद होतो.” त्या पुढे म्हणाल्या, “संकट घेऊन रडत बसण्यापेक्षा मार्ग काढत राहा.” त्यांच्या या शब्दांनी प्रशिक्षणार्थींना कठीण परिस्थितीतही लढण्याचे धैर्य दिले.
यावेळी वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाळे, पद्मश्री डॉ.सौ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक दादा गायकवाड, क्रीडा प्रशिक्षक सुधीर आक्केवार, वन्यजीव अभ्यासक मुकेश चौधरी, प्रसन्न गायकवाड, गोपाल गायकवाड उपस्थित होते, वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाळे यांनी डॉ. गवईंच्या आशीर्वादाबद्दल आभार व्यक्त केले. त्यांच्या आगमनाने चिखलदऱ्याच्या हिरव्यागार वातावरणात एक विलक्षण भावस्पर्शी क्षण अनुभवता आला. एका मातृहृदयातून मिळालेला आशीर्वाद वनसेवेसाठी झटणाऱ्या या तरुणांच्या आयुष्यातील एक अनमोल प्रेरणादायी ठेवा बनून राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


