बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावे: ‘मुक्ती आंदोलन समिती’चा जनसंवाद कार्यक्रम संपन्न
आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हजारो बौद्ध अनुयायांची उपस्थिती; भन्ते विनाचार्य यांचे मार्गदर्शन
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ०५ सप्टेंबर २०२५:
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे ‘जनसंवाद’ कार्यक्रम आणि ‘पंचशील धम्म ध्वज यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आले पाहिजे या मागणीसाठी झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील हजारो बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती.

भन्ते विनाचार्य यांचे मार्गदर्शनपर प्रवचन
या कार्यक्रमात राष्ट्रीय धम्मगुरु भन्ते विनाचार्य यांनी मार्गदर्शनपर प्रवचन दिले. त्यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सांगितले की, ज्याप्रमाणे राम मंदिर हिंदूंचे, मक्का-मदिना मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे, त्याचप्रमाणे बोधगया येथील महाविहार हे फक्त भारताचे नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. बुद्ध विचारांमुळे जगामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, आणि उच्च-नीचतेचा भेदभाव संपुष्टात आला. त्यामुळे या महाविहारासाठी जगभरातून येणाऱ्या धम्मदानाचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.
भन्ते विनाचार्य यांनी यावेळी जागतिक स्तरावरील उपासकांसाठी प्रशिक्षण केंद्र, भिक्षूंसाठी जागतिक विद्यापीठ आणि बुद्ध विचारधारा शिकवणारे केंद्र असावे, अशी मागणी केली. यासाठी भारतातील बौद्ध उपासकांनी एकत्र येऊन लढा देण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमातील मान्यवर आणि उपस्थितांचा सहभाग
या कार्यक्रमाला भदंत महाथेरो धम्मानंद (पिंपरी-चिंचवड), भन्ते धम्मानंद (येरवडा, पुणे), महिला भिक्षुणी मेत्ता (मावळ), भन्ते सुमेधो आणि इतर अनेक बौद्ध धम्मगुरु उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भन्ते विनाचार्य यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक कार्यकर्ते संजय उबाळे यांनी प्रास्ताविक केले, तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल सूर्यवंशी यांनी शहराच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
धम्मदिप विहाराचे जेष्ठ उपासक मिलिंद रणदिवे यांनी भन्तेच्या कार्याचा परिचय करून दिला आणि गौतम जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. शहरातील ९० बुद्धविहारातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. भन्ते डॉ. हर्षबोधी यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले.
या कार्यक्रमाचे संयोजन तक्षशीला बुद्धविहार प्राधिकरण, धम्मदिप बुद्धविहार यमुनानगर, लुंबिनी बुद्धविहार प्राधिकरण, सम्राट अशोक बुद्धविहार पी.सी.एम.सी. कॉलनी निगडी, बौद्ध समाज विकास महासंघ, भारतीय बौद्धजन समिती आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी केले होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

2 comments
अत्यंत महत्त्वाचे विषयावर छान मुद्देसूद वृत्तांकन
Thank you sir