सरकारचा भांडवलदारांना पिळवणुकीचा परवाना? कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाला कामगार संघटनेचा तीव्र विरोध
राज्य सरकारच्या निर्णयाने कामगारांच्या हक्कांवर गदा; ‘कष्टकरी संघर्ष महासंघा’ने चिंचवडमध्ये घेतला आक्षेप
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे , ०५ सप्टेंबर २०२५:
महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच कारखाने अधिनियम १९४८ मध्ये दुरुस्ती करत कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कारखान्यांमध्ये २० हून अधिक कामगार आहेत, त्यांच्यासाठी दिवसाचे ८ तास कामाची मर्यादा १२ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर किरकोळ आस्थापनांमध्ये कामाचे तास ९ वरून १० करण्यात आले आहेत. या निर्णयाविरोधात ‘कष्टकरी संघर्ष महासंघा’ने चिंचवड येथे बैठक घेऊन तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
“हा निर्णय कामगार विरोधी” – काशिनाथ नखाते
या बैठकीत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “सरकारने घेतलेला हा निर्णय भांडवलधार्जिना असून, तो स्पष्टपणे भांडवलदारांना कामगारांच्या पिळवणुकीचा अधिकृत परवाना देत आहे.” या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महादेव गायकवाड, अनिल कदम, दिलीप डिकोळे, वंदना कदम, राजश्री जोगदंड, अंजना मोरे, विद्या भोसले यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.
कायद्यातील बदल आणि कामगारांचे शोषण
नखाते यांनी या निर्णयामुळे होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. यापूर्वी आठवड्याला कामाचे तास ४८ होते, जे आता ६० पर्यंत वाढवले आहेत. १२ तास काम करूनही जर आठवड्याची ४८ तासांची मर्यादा ओलांडली नाही, तर कामगारांना ‘ओव्हरटाईम’ मिळणार नाही, ज्यामुळे वेळेची चोरी होईल, असे त्यांनी सांगितले. कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी केंद्र सरकारने ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ या धोरणांतर्गत ४४ कामगार कायदे रद्द करून ४ श्रम संहिता आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संघर्ष
कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून देत नखाते म्हणाले की, १८९० पूर्वी कामगारांकडून १२ ते १६ तास काम करून घेतले जात होते. त्यावेळी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी संघटना स्थापन करून कामाचे तास कमी केले. पुढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदामंत्री असताना कामगारांचे हित जपण्यासाठी अनेक कायदे केले आणि ८ तासांचा कामाचा दिवस निश्चित केला. या पार्श्वभूमीवर, कामाचे तास वाढवण्याचा निर्णय हा कामगार चळवळीला मागे घेऊन जाणारा आहे, असे त्यांनी म्हटले.
आंदोलनाचा इशारा
जगभरात कामाचे दिवस चार ते पाच करून कामगारांच्या आरोग्याची आणि वैयक्तिक वेळेची काळजी घेतली जात असताना, महाराष्ट्रात वेळेत वाढ करणे अत्यंत हानिकारक आहे. नखाते यांनी ‘८ तास काम, ८ तास झोप आणि ८ तास कुटुंबासाठी व वैयक्तिक कामासाठी’ हे सूत्र योग्य असल्याचे सांगितले. सरकारने भांडवलदारांच्या फायद्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे कामाच्या ठिकाणी अपघात, चिडचिड आणि संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयाला आपला विरोध कायम राहील आणि प्रसंगी आंदोलनही करू, असा इशाराही त्यांनी दिला.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
