पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: थोर विचारवंत, प्रख्यात अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त तसेच ‘राष्ट्रीय अभियंता दिना’चे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि अतिरिक्त आयुक्त विक्रान्त बगाडे यांच्या हस्ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
तसेच महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनीही भारतरत्न विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशाच्या पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन आणि औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत अद्वितीय व अथांग आहे. त्यांच्या दूरदृष्टी, कार्यनिष्ठा आणि अथांग तांत्रिक ज्ञानातून देशाच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. त्यांचे हे कार्य आजच्या आधुनिक पिढीतील अभियंत्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या नियोजनबद्ध आणि आधुनिक विकासामध्ये महापालिकेतील सर्व अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरळीत पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था आणि पर्यावरणपूरक विकास यांसह विविध नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिकेचा अभियंता वर्ग अहोरात्र कार्यरत आहे.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘अभियंता दिन’ (Engineers’ Day) म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो. अभियंत्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासातील त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तंत्रज्ञान, नवकल्पना आणि नाविन्यपूर्ण अविष्कारांच्या माध्यमातून अभियंते समाजाच्या प्रगतीला आणि शाश्वत भविष्याला भक्कम आकार देण्याचे कार्य करत असतात.
या प्रसंगी शहर अभियंता मनोज सेठीया, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, माजी अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे, उप आयुक्त अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
