अमरावती विमानतळाला ‘अजितदादा पवार’ यांचे नाव द्या; लोकभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, ३ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कार्यान्वित झालेल्या अमरावती येथील बेलोरा विमानतळास राज्याचे लाडके नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अमरावती अखबारचे संपादक ऋषिकेश शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून ही आग्रही मागणी केली आहे.
अमरावती विमानतळाच्या उभारणीत आणि या प्रकल्पाला गती देण्यात स्व. अजितदादा पवार यांचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे, या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी ते स्वतः उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, विशेषतः विदर्भातील प्रकल्पांसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यांच्या याच योगदानाचा आणि ऋणांचा सन्मान म्हणून हे नामकरण व्हावे, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
ऋषिकेश शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापु आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अजितदादांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचे नेतृत्व गमावले आहे. पश्चिम विदर्भातील जनतेच्या मनात त्यांच्याविषयी मोठी कृतज्ञता आहे. त्यामुळे ‘अजितदादा पवार विमानतळ’ असे नाव देणे हा त्यांच्या कार्याचा योग्य गौरव ठरेल.”
अमरावतीच्या विकासासाठी अजितदादांनी घेतलेले निर्णय आणि दिलेला निधी यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला. जनभावना लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकारने या नामकरणाबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती जिल्ह्यातील विविध स्तरांतून केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.









