ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन!
पिंपरी/पुणे, प्रतिनिधी आकाश कांबळे दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: भारतातील ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी परिसंस्थेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक बनवण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था (CIRT), ऑटोसिफू प्रा. लि. आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी प्रिन्सिपल्स मीट २०२६” (Leadership and Institutional Engagement Meet on Automotive Cybersecurity Talent Development Ecosystem) चे आयोजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “सध्या वाहनांमध्ये सॉफ्टवेअर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह मोबिलिटीसाठी सायबर सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षेचा संबंध केवळ वाहनांच्या सुरक्षेशी नसून रस्ता सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांच्या विश्वासाशी थेट जोडलेला आहे.”
या दिमाखदार कार्यक्रमास सीआयआरटीचे (CIRT) संचालक डॉ. देवेंद्र सिंह (IAS), सीआयआरटीचे एमडीसी व ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा प्रमुख फारुख मखदूम, जगमंगल सोशल फाउंडेशनच्या संस्थापक संचालक प्रिया गुजराथी, विशेष पोलीस महानिरीक्षक (निवृत्त) डॉ. शहाजी सोलुंखे (IPS), ऑटोसिफू प्रा. लि.चे संचालक व सह-संस्थापक जगन्नाथ तिवारी, ऑपरेशन्स प्रमुख विक्रम पगारे, जगमंगल सोशल फाउंडेशनचे शैक्षणिक सल्लागार विद्यावाचस्पती विद्यानंद प्रा. डॉ. शैलेश कुलकर्णी, केथ इलेक्ट्रो सर्किट्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल सुलताने, बजाज ऑटोचे संशोधन व विकास (R&D) उपाध्यक्ष मिलिंद पगारे, स्कोडा-फोक्सवॅगन समूहाचे तांत्रिक प्रशिक्षण तज्ज्ञ लोकेश कुमार, नॉर ब्रेम्से सिस्टिम्सचे (R&D) वरिष्ठ उपाध्यक्ष महेश शहापुरे, फिलिप जॉन (अशोक लेलँड) आणि अरुण बिष्ट उपस्थित होते.
तसेच शैक्षणिक क्षेत्रातील डॉ. संदीप पाधारवाडकर, डॉ. मोहन वामन, डॉ. आशिष पानट, डॉ. संतोष सोनवणे, डॉ. संदीप पाचपांडे आणि डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्यासह अनेक नामांकित तज्ज्ञ उपस्थित होते.
कार्यक्रमात माहिती देताना तेजस गुजराथी यांनी सांगितले की, १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान संगणक व अभियांत्रिकी शाखेच्या (BCA, MCA आणि Engineering) तब्बल ५०,००० विद्यार्थ्यांसाठी ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षा विषयावर पहिल्या भव्य जनजागृती अभियानाचे आयोजन केले जात आहे. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना भविष्यातील सॉफ्टवेअर-आधारित वाहन तंत्रज्ञान, सायबर धोके आणि करिअरच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल.
सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्यामुळे देशात ऑटोमोटिव्ह सायबर सुरक्षेत कुशल तरुण घडतील. भारत सरकारने वाहनांसाठी ‘सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टम’ (CSMS) आणि ‘सॉफ्टवेअर अपडेट मॅनेजमेंट सिस्टम’ (SUMS) लागू केले असून यामुळे सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य मिळेल, असे फारुख मखदूम यांनी सांगितले. हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळा, वाहन सुरक्षा चाचण्या आणि उद्योगांशी निगडित प्रात्यक्षिकांचा अनुभव देऊन भविष्यातील तज्ज्ञ घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
“भविष्यातील मोबिलिटी ही केवळ इलेक्ट्रिक किंवा कनेक्टेड वाहनांवर अवलंबून नसून ती सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहनांवर आधारित असेल,” हा स्पष्ट संदेश या परिषदेतून देण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.






