104
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी वसंतराव कुदळे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिष्टचिंतन!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी आणि इंद्रायणी बँकेचे संचालक वसंतराव बाबुराव कुदळे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त काळेवाडीतील ‘रागा पॅलेस’ येथे बुधवारी सायंकाळी भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वसंतराव कुदळे यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व अभिष्टचिंतन दिले.
या स्नेहमिलन सोहळ्यात इंद्रायणी सहकारी बँकेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष एस. बी. चांडक आणि संचालक सुरेश जुमानी यांच्या शुभहस्ते वसंतराव कुदळे यांचा विशेष प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वसंतरावांसोबतच्या जुन्या आठवणींना आणि त्यांच्या प्रशासकीय व सामाजिक कार्यातील योगदानाला उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वसंतनाना लोंढे, माजी नगरसेवक हरेश आसवानी, रंगनाथ कुदळे, शांती सेन, चंद्रकांत भोळे, सुरेश म्हेत्रे, राजेंद्र गावडे, विद्यमान नगरसेविका प्रियंका कुदळे, निकिता कदम, इंद्रायणी बँकेचे उपाध्यक्ष महेश चांडक, जयहिंद बँकेचे संचालक बापू आल्हाट, पिंपरी-चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे, ‘सकाळ’चे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद भुजबळ, माजी सहायक आरोग्य अधिकारी प्रकाश जवळकर, युवा नेते ऋषिकेश संजोग वाघेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत तावरे, योग वर्गाचे कामता प्रसाद पटेल, निमगाव दुडेचे सरपंच रामभाऊ गायकवाड, दिशा सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष संतोष बाबर, संचालक भरत आल्हाट आणि प्रबोधनकार शारदा मुंडे आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून ‘सरगम ग्रुप’च्या वतीने सुश्राव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसंतराव कुदळे यांचे चिरंजीव विक्रम कुदळे व विशाल कुदळे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपुलकीने स्वागत केले. कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन श्रीकांत कदम यांनी केले. तर शेवटी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरीजादेवी प्रवीण कुदळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

