8

शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशाची गुरुकिल्ली: मनीषा तपस्वी
पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ८ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: समाजाला भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्येवर प्रभावी उपाय शोधून त्याचे व्यावसायिक संधीत रूपांतर करणे म्हणजेच खरी यशस्वी उद्योजकता होय. जीवनात आणि व्यवसायात शिस्तबद्धता, वेळेचे अचूक नियोजन आणि पैशांचे योग्य व्यवस्थापन हीच यशाची सर्वोच्च गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन ‘दे आसरा फाउंडेशन’च्या व्यवस्थापक मनीषा तपस्वी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) मधील उद्योजकता सेल आणि ‘दे आसरा फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकसित करण्यासाठी ‘यशस्वी उद्योजक’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्त्वपूर्ण कार्यशाळेस ‘दे आसरा’च्या व्यवस्थापक मनीषा तपस्वी, स्नेहा दिवेकर आणि SBPIM च्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना स्नेहा दिवेकर म्हणाल्या की, “जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करायचे असेल, तर प्रथम कोणासोबतही प्रत्यक्ष काम सुरू करा, त्यांना मदत करा, अनुभवाच्या गाठीशी अनुभव बांधा आणि मगच स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करा. उद्योजक मानसिकता हा कोणत्याही व्यवसायाचा सर्वात मोठा आधारस्तंभ असतो; कारण सर्वकाही तुमच्या मानसिकतेवरच अवलंबून असते.”
पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सल्ले दिले. भारतात आणि जगात भन्नाट कल्पनांची कमतरता नाही, त्यामुळे सभोवतालचे बारकाईने निरीक्षण करून स्वतःचा वैयक्तिक ब्रँड (Personal Brand) तयार करा. पुढील ५ वर्षांनंतर तुम्हाला स्वतःला नेमके कुठे पाहायचे आहे, हे आजच कागदावर लिहून काढा आणि त्या दिशेने प्रामाणिकपणे काम करा. वेळ वाया न घालवणे, नवनवीन लोकांशी संपर्क साधणे (Networking) आणि एकमेकांना सहकार्य करणे हे गुण उद्योजकतेला अत्यंत पूरक आहेत.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेंद्र देवकर यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
