9

‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेची घोषणा; आमदार शंकर जगताप यांचा महत्त्वपूर्ण निर्णय!
पिंपरी-चिंचवड / चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ६ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड: नाटक, संगीत आणि कला नसती तर माणूस वेडा झाला असता, याची अनुभूती आपण कोविड काळात घेतली आहे. कलेचे आपणही काहीतरी देणे लागतो या भावनेतून आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्य चळवळीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आगामी काळात ‘कै. नाना पाटेकर राज्यस्तरीय स्मृती करंडक अंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ आयोजित केली जाईल, अशी घोषणा आमदार शंकर जगताप यांनी चिंचवड येथे केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पिंपरी-चिंचवड शाखा) आणि कै. लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा शहरात आयोजित करण्यात येणार आहेत. जोपर्यंत भाऊसाहेब भोईर आणि मी सक्रिय आहोत, तोपर्यंत हा सांस्कृतिक उपक्रम अविरत सुरूच राहील, असा विश्वासही आ. जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
चिंचवड येथील पंडित पद्माकर कुलकर्णी कला मंदिर (प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह तळमजला) येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने ‘कलाकार कट्टा’ संस्थेचा वर्धापन दिन व रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात आ. जगताप बोलत होते.
या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष तथा ‘कलाकार कट्ट्याचे’ संस्थापक, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे यांच्यासह नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दिमाखदार सोहळ्यात कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सुरेश कंक, वृषाली भणगे, ऋतुजा महाजन, गणेश कांबळे, शुभ्रा घायतडक आणि केतन लुंकड यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच ‘नांदी नव्या पर्वाची, शोध प्रतिभेचा जागर कलेचा’ हे घोषवाक्य असलेल्या कलाकार कट्ट्याच्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, “नैराश्याच्या आणि अपयशाच्या काळात रंगभूमी माणसाला जगण्याची नवी उमेद आणि सकारात्मक दृष्टिकोन देते. पिंपरी-चिंचवडमध्ये नाट्य चळवळ रुजवण्यासाठी लोकनेते शरद पवार, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, विलास लांडे व आझमभाई पानसरे यांचे मोठे योगदान लाभले आहे. येथील नाट्यप्रेमींच्या सहकार्यामुळेच शहरात दोन वेळा अखिल भारतीय नाट्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला, जे देशातील एकमेव उदाहरण आहे.”
या वर्धापन दिन सोहळ्यात स्थानिक कलाकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. नृत्यार्पण ग्रुपच्या वतीने नृत्य सादरीकरण तर स्वर सुधा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर गायन सादर केले. बालकलाकारांच्या सादरीकरणाने रंगमंचावर वेगळीच रंगत आणली. सुरेश कंक, संजय गमे आणि राधाबाई वाघमारे यांनी काव्यवाचन केले, तर आसाराम कसबे यांनी पारंपरिक भारुड सादर केले. दिवंगत लावणी कलावंत मधू कांबीकर यांना आदरांजली वाहताना शुभ्रा घायतडक यांनी लावणी सादर केली, तर गणेश कांबळे यांनी शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर प्रभावी कलाविष्कार सादर केला. वैशाली गायकवाड आणि रती देशमुख यांच्या सुंदर चित्रांचे प्रदर्शन रसिकांसाठी खुले होते.
कार्यक्रमाचे आयोजन कलाकार कट्टा नियोजन समितीचे राजेंद्र बंग, सुहास जोशी, सीमा गांधी, गौरी लोंढे, राज अहेरराव, रवी दामोदरे, संतोष रासने, किरण येवलेकर, अश्विनी कुलकर्णी, प्रकाश ढवळे व आसाराम कसबे यांनी केले. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश थिटे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
