8

सावली निवारा केंद्रातील बेघर व्यक्तींसोबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी साजरी केली दिवाळी!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि आप्तांसोबत साजरा होणारा जिव्हाळ्याचा सण… मात्र, ज्यांच्या आयुष्यात नात्यांची साथ सुटली आहे आणि ज्यांच्या वाट्याला एकटेपणा आला आहे, अशा निराधार माता-पित्यांच्या आयुष्यात मायेचा प्रकाश पसरवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यंदाची दिवाळी पिंपरीतील ‘सावली’ निवारा केंद्रातील ७५ बेघर व्यक्तींसोबत अत्यंत साधेपणाने आणि जिव्हाळ्याने साजरी केली.
यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत दिवाळीचा फराळ करत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत मनमोकळा संवाद साधला. या भेटीदरम्यान अनेकांच्या जीवनप्रवासातील वेदना, संघर्ष आणि सावली केंद्राकडून मिळणारा आधार ऐकून आयुक्तही भावूक झाले होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून आणि ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ या संस्थेच्या सहकार्याने चालविण्यात येणारे ‘सावली’ निवारा केंद्र हे बेघर, निराधार आणि वंचित व्यक्तींसाठी हक्काचा आसरा बनले आहे. रस्तებზე निराधार अवस्थेत आढळलेल्या, नातेवाईकांपासून दुरावलेल्या तथा मानसिक व शारीरिक आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींना या केंद्रात सुरक्षित निवारा, पौष्टिक अन्न, औषधोपचार आणि मायेची सावली दिली जाते. अनेकांसाठी हे केंद्र आयुष्याच्या उत्तरार्धात लाभलेले एक नवीन कुटुंबच ठरले आहे.
या भेटीप्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ संस्थेचे एम. ए. हुसैन, व्यवस्थापक गौतम थोरात आणि समाजसेवक ॲग्नस फ्रान्सिस उपस्थित होते.
निवारा केंद्रात पोहोचल्यानंतर आयुक्तांनी कोणत्याही औपचारिकता न पाळता प्रत्येक लाभार्थ्यामागे थांबून त्यांची स्वतंत्रपणे आस्थेने विचारपूस केली. तुम्ही येथे कसे आलात? येथे तुमची काळजी कशी घेतली जाते? जेवण आणि औषधोपचार वेळेवर मिळतात का? काही अडचणी आहेत का? अशा विविध प्रश्नांमधून त्यांनी प्रत्येकाच्या भावना जाणून घेतल्या. केंद्रातील काहींनी सांगितलेले त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रसंग हृदयद्रावक होते. आयुष्याच्या प्रवासात कधीतरी माणसांची साथ सुटली तरी अशा व्यक्तींना पुन्हा उभे करण्याचे काम ‘सावली’च्या माध्यमातून होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक लाभार्थ्याची घेतली जाणारी उत्तम काळजी आणि आपुलकीच्या वातावरणाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी आयुक्तांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून केंद्राच्या कामकाजाची आणि उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती घेतली. तसेच संस्थेला भेडसावणाऱ्या स्थापत्यविषयक व अन्य समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. निवारा केंद्रासारखे उपक्रम समाजातील दुर्लक्षित घटकांना जगण्याचा नवा आधार देतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीच्या प्रकाशपर्वात आयुक्तांच्या या भेटीमुळे केंद्रातील वातावरणात एक वेगळाच आनंद व आपुलकी पाहायला मिळाली. पदाचा मोठेपणा बाजूला ठेवून प्रत्येक निराधार व्यक्तीशी साधलेला हा जिव्हाळ्याचा संवाद सर्वांच्याच स्मरणात राहणारा ठरला.
“सावली निवारा केंद्र हा समाजातील निराधार व वंचित व्यक्तींना आधार देणारा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. दिवाळीसारखा सण या माता-पित्यांसोबत साजरा करताना त्यांच्या भावना जवळून अनुभवता आल्या. प्रत्येक व्यक्तीला केवळ अन्न आणि निवारा मिळणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेम, आपुलकी आणि सन्मानाची वागणूक मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केंद्राच्या स्थापत्यविषयक समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाईल.”— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
