10

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाचे पिंपरी-चिंचवडमधील २२ संवेदनशील स्थळांवर विशेष लक्ष!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: दिवाळीचा आनंददायी सण सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आणि आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. उपआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपअग्निशमन अधिकारी गौतम इंगवले व श्रीकांत वैरागर यांच्या नेतृत्वाखाली २५० कर्मचाऱ्यांचा विशेष ताफा आणि २० मोठी अग्निशमन वाहने व गस्ती वाहने शहरात तैनात करण्यात आली आहेत. शहरातील गर्दीची आणि संवेदनशील अशी २२ प्रमुख ठिकाणे निश्चित करून तिथे विशेष लक्ष ठेवले जात आहे.
दिवाळीतील फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांचा वापर व बाजारपेठेतील गर्दीमुळे आगीची शक्यता वाढते. मागील वर्षी दिवाळीत आगीच्या सुमारे ७० घटना घडल्या होत्या; त्याचा अभ्यास करून यंदा विशेष प्रतिबंधात्मक नियोजन करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून २४ तास आपत्कालीन सेवा कार्यरत राहणार आहे.
शहरातील शगुन चौक, फुगेवाडी, पिंपळे गुरव, लांडगे नाट्यगृह परिसर, मॅगझिन चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, चिंचवड लिंक रोड, वाकड, दत्त मंदिर रस्ता, डांगे चौक, जगताप डेअरी, रावेत आणि मुकाई चौक यासह प्रमुख २२ ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आणि पथके सतत गस्त घालत राहणार आहेत.
गर्दीच्या ठिकाणी, इमारतींजवळ किंवा वाहनांपासोबत फटाके फोडू नयेत. नायलॉन ऐवजी सुती (कॉटन) कपडे परिधान करावेत. न फुटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल किंवा कचऱ्याजवळ फटाके उडवू नयेत. फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली व ओले कापड नक्की ठेवावे. लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे. आग लागल्यास स्वतः विझवण्याचा धोका न पत्करता तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधावा.
१. पिंपरी (मुख्य) ९९२२५०१४७५ , २. भोसरी ९९२२५०१४७६ , ३. प्राधिकरण ९९२२५०१४७७ , ४. रहाटणी ९९२२५०१४७८ , ५. चिखली ८६६९८९४१०१ , ६. तळवडे ९५५२५२३१०१ , ७. थेरगाव ७०३०९०७९९९ , ८. मोशी ७२६४९४३३३३ , ९. चोवीसावाडी ७७५८९९२८१७ , १०. नेहरूनगर ८४८४८८४१०१ .
“दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्व यंत्रणा २४ तास सज्ज ठेवली असून नागरिकांनीही नियमांचे पालन करून सुरक्षित दिवाळी साजरी करावी.”— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“मागील वर्षातील दुर्घटनांचा अभ्यास करून शहरातील २२ संवेदनशील स्थळे निश्चित केली आहेत. २५० कर्मचारी व वाहनांद्वारे गस्त सुरू असून आपत्कालीन प्रसंगी तातडीने अग्निशमन केंद्राशी संपर्क साधावा.”— व्यंकटेश दुर्वास (मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

