27

रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयात दीपावली महोत्सवानिमित्त भव्य हस्तकला प्रदर्शन व सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संपन्न!
दारापूर प्रतिनिधी जयकुमार चर्जन , दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
दारापूर: श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचलित रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय, दारापूर येथे दीपावली महोत्सवानिमित्त अत्यंत उत्साहाच्या आणि रंगतदार वातावरणात भव्य हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी दिवे आणि हस्तनिर्मित फुले तयार करून आपल्या सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. या विशेष उपक्रमामुळे महाविद्यालयात दिवाळीचा सण अधिक उत्साहाने, सांस्कृतिक समृद्धीने आणि सर्जनशीलतेने साजरा झाला.
विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, सामाजिक बांधिलकी, एकात्मता आणि चांगले संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हस्तकला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. विद्यार्थिनींनी अत्यंत कल्पकतेने विविध आकारांचे सुंदर आकाश कंदील तयार केले. काहींनी पारंपरिक पद्धतीचे मातीचे दिवे सजवले, तर काहींनी कागद, कापड आणि रीसायकल केलेल्या टाकाऊ साहित्यापासून आकर्षक दिवे व फुले बनवली. विशेष म्हणजे, काही विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक कंदील तयार करून दिवाळी साजरी करताना निसर्गाचे रक्षण करण्याचा अत्यंत मोलाचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला कृतींचे परीक्षण करण्यासाठी विशेष परीक्षण समिती उपस्थित होती. त्यांनी गुणांकन करून विजेत्यांची नावे जाहीर केली. आकाश कंदील स्पर्धा- प्रथम क्रमांक समिक्षा बाळू हरणे , द्वितीय क्रमांक श्रावणी अनिल भातुरकर , हस्तकला प्रदर्शन स्पर्धा- प्रथम क्रमांक कृपा दीपक वाठ , द्वितीय क्रमांक पुनम संजय कुरवालळे. प्राचार्या वर्षा भटकर तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थिनींचे व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा विनोद भटकर (मोरशे) या होत्या. मुख्य पाहुणे म्हणून प्रा. इसळ, तर परीक्षक म्हणून प्रा. विधळे व प्रा. भुयार यांनी कामकाज पाहिले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या वर्षा भटकर यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील कलागुणांना योग्य वाव मिळतो आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होते. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून तो ज्ञानाचा, एकतेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा सण आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात अभ्यासाइतकीच जीवनकौशल्यांना व कलांना महत्त्व दिले पाहिजे.”
या भव्य कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन प्रा. प्रतिभा रघुवंशी यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. केचे, प्रा. देशमुख, प्रा. बोराडे, प्रा. डॉ. झोटिंग, प्रा. डॉ. अनिल भुरके, प्रा. ढोके, प्रा. मुळे, प्रा. डॉ. धांडे, प्रा. कोरडे, प्रा. कडू, प्रा. रीना भडके, प्रा. वानखडे, प्रा. बेलसरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा दीपावली महोत्सव संस्मरणीय ठरला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
