53

पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण; ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान, सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या दोन्ही विकासप्रकल्पांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडली आहे.
महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या दिमाखदार सोहळ्यास आमदार उमा खापरे, अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आर.पी.आय. गटनेते कुणाल वाव्हळकर, नगरसदस्य जितेंद्र ननावरे, कुशाग्र कदम, संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, पंकज भालेकर, विराज लांडे, धर्मपाल तंतरपाळे, नगरसदस्या संगीता ताम्हाणे, भीमाताई फुगे, मनीषा लांडे, वर्षा जगताप, निकिता कदम, प्रियांका कुदळे, प्रतीक्षा जवळकर, सारिका मासुळकर, अरूणा लंघोटे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी डेअरी फार्म येथे ६५.२८ कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाणपुलामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक (एल. सी. नं. ६०) आता कायमस्वरूपी बंद होणार आहे. दापोडी-निगडी रस्त्याकडून पिंपरी गावात जाणाऱ्या नागरिकांना आता रेल्वे फाटकावर ताटकळत न राहता विनाथांबा प्रवास करता येणार आहे. पिंपरी, पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरातील नागरिकांना दापोडी-निगडी रस्त्याला जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग ठरणार आहे. यामुळे शगुन चौक, साई चौक आणि इंदिरा गांधी पुलावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना हा अत्यंत सोयीचा आणि गतिमान पर्याय उपलब्ध झाला आहे.
एकूण प्रकल्प खर्च ₹६५.२८ कोटी (स्वीकृत निविदा रक्कम) , पुलाची लांबी व रुंदी लांबी ५६५ मीटर, रुंदी १७.२ मीटर. रेल्वे स्पॅन व्हायाडक्ट लांबी ४५ मीटर आणि रुंदी १९.५ मीटर. पोहोच रस्ते (Approach Roads) दापोडी-निगडी बाजू १३५ मीटर, तर पिंपरी बाजू १४५ मीटर (रुंदी १७.२ मीटर). सेवा रस्ते (Service Roads) दोन्ही बाजूंना पदपथासह ९.४ मीटर व १८ मीटर रुंदीचे सुसज्ज सेवा रस्ते. संरक्षण विभागाची जागा केंद्राच्या संरक्षण मंत्रालयाकडून जुलै २०२२ मध्ये हस्तांतरित ५.९६ एकर जागेवर ही उभारणी करण्यात आली आहे.

नागरिकांना विविध नागरी सुविधा, दाखले आणि तक्रार निवारणासाठी क्षेत्रीय कार्यालयात जावे लागते. महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सुसज्ज व अत्याधुनिक इमारतीचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या नव्या प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना सर्व सेवा एकाच छताखाली गतीने मिळणे शक्य होणार आहे.
“पिंपरी-चिंचवडचा विस्तार वेगाने होत असून वाढत्या वाहनांच्या संख्येनुसार वाहतूक कोंडीमुक्त प्रवास देणे आमचे प्राधान्य आहे. डेअरी फार्म उड्डाणपुलामुळे दोन भागांतील अंतर कमी होऊन परिसरातील व्यापार आणि उद्योगांनाही मोठा दिलासा मिळेल.”— रवी लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
“भविष्यातील गरजा लक्षात घेऊन या उड्डाणपुलाची रचना करण्यात आली आहे. यात वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार करण्यात आला असून, शगुन चौक व पिंपरी पुलावरील ताण कमी होऊन वेळेची मोठी बचत होईल.”— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
