33

आयुक्त बंगल्यासमोरील अदानी डेटा सेंटर प्रकल्प तात्काळ रद्द करा; मारुती भापकर यांचे महापालिका प्रशासनाला पत्र!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त निवासस्थानासमोर एमआयडीसीच्या (MIDC) जागेवर उभारण्यात येत असलेला अदानी समूहाचा (Adani ConneX / Terravista Developers) डेटा सेंटर प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरण आणि पाण्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत असून, हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत मारुती भापकर यांनी महापालिकेचे महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे यांना अधिकृत निवेदन पाठवले आहे.
डेटा सेंटरमधील सर्व्हर्स थंड ठेवण्यासाठी (Cooling) दररोज १५ लाख लिटर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासणार आहे. या डेटा सेंटरमुळे परिसराच्या १ ते ३ किलोमीटर परिघात सुमारे २ ते ३ अंश सेल्सिअसने तापमान वाढणार असून, तीव्र ध्वनी प्रदूषणही होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनमानावर या प्रकल्पामुळे अत्यंत विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पत्रात भापकर यांनी नमूद केले आहे की, “संपूर्ण महाराष्ट्र आणि देश भीषण अल-निन्होच्या प्रभावामुळे दुष्काळाच्या छायेत आहे. राज्य सरकारने पाणीकपाती संदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आधीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, भविष्यात यात आणखी कपात करावी लागण्याची शक्यता आहे. पवना, आंध्रा व भामा आसखेड धरणाचे पाणी शहराला देण्यास शेतकरी तीव्र विरोध करत आहेत. अशा नाजूक परिस्थितीत पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काचे १५ लाख लिटर पाणी एका खासगी डेटा सेंटरला देणे हा नागरिकांवर घोर अन्याय आहे.”
“म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो” या म्हणीचा दाखला देत भापकर यांनी स्पष्ट केले की, जर आज या प्रकल्पाला विरोध केला नाही, तर भविष्यात शहराच्या पाण्याचा आणि पर्यावरणाचा भीषण प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून पिंपरी-चिंचवडच्या हितासाठी अदानी समूहाचा हा डेटा सेंटर प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, अशी ठाम मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
