26

‘दिवाळीत ८ हजार रुपयांचे रोख अनुदान’; पंतप्रधान मोदींच्या नावे पसरणाऱ्या लिंकपासून सावध राहा: पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिंचवड: दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीय नागरिकांसाठी ₹८,००० चे रोख अनुदान मंजूर केले असल्याचे फसवे संदेश सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि इतर सोशल मीडियावर प्रचंड वेगाने प्रसारित केले जात आहेत. अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, असे स्पष्ट आवाहन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.
प्रसारित होणाऱ्या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तात्काळ अनुदान मिळवण्याचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, अशा अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास नागरिकांची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील चोरीला जाऊन मोठे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता सायबर पोलिसांनी वर्तवली आहे.
₹८,००० रोख अनुदान मिळण्याबाबत आलेल्या कोणत्याही अनोळखी अथवा संशयास्पद संदेशांवर मुळीच विश्वास ठेवू नका. व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. कोणतेही शासकीय अनुदान मिळवण्यासाठी कोणतेही शुल्क किंवा आगाऊ पैसे भरू नयेत. गुगल, सोशल मीडिया अथवा सर्च इंजिनवर दिसणाऱ्या अनधिकृत वेबसाईट किंवा लिंकवर तात्काळ विश्वास ठेवू नका. कोणत्याही वेबसाईटवर ऑनलाईन व्यवहार किंवा माहिती भरण्यापूर्वी संबंधित वेबसाईटचा पत्ता (URL) आणि तिची अधिकृतता नीट तपासून घ्या. अनोळखी लिंक किंवा फॉर्मवर आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा बँक खात्याची कोणतीही माहिती भरू नका. कोणालाही आपला OTP, ATM PIN, CVV किंवा UPI PIN कधीही सांगू नका. असे संशयास्पद मेसेज इतर कोणत्याही ग्रुपवर किंवा व्यक्तींना फॉरवर्ड करणे टाळा. कोणत्याही सरकारी योजनेची खात्रीशीर माहिती केवळ केंद्र व राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच (Official Websites) तपासावी.
“नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पूर्ण सतर्कता बाळगावी. दुर्दैवाने कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ ‘१९३०’ (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी.”— रोहिदास पवार (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पिंपरी-चिंचवड)
सायबर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड संपर्क माहिती- एल्प्रो सिटी मॉल जवळ, चिंचवडगाव, पुणे – ४११०३३. ई-मेल cybercell.pcpc-mh@mahapolice.gov.in संपर्क क्रमांक ०२०-२७३५०९३९ / हेल्पलाईन: १९३०
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
