2

एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दिवाळी मंडई’ हा उत्तम व्यावसायिक अनुभव: डॉ. कीर्ती धारवाडकर
पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दिवाळी मंडई’ हा अत्यंत मोलाचा आणि व्यावहारिक व्यावसायिक अनुभव आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन (Business Planning), किंमत निर्धारण, विपणन (Marketing), ग्राहक संवाद आणि विक्री व्यवस्थापनाचे धडे प्रत्यक्ष मिळतात, असे प्रतिपादन एसबीपीआयएमच्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे, या मुख्य उद्देशाने ‘दिवाळी मंडई’ या उद्योजक स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धा व महोत्सवाचे उद्घाटन संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. भूषण परदेशी, डॉ. स्वप्नील सोनकांबळे, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. इरम अन्सारी, डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. अमरीश पद्मा, डॉ. संतोष शिंदे, डॉ. विशाल वाघ, डॉ. दिलीप पवार, डॉ. पद्मलोचन बिसोई, डॉ. समीर ठाकूर यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समन्वयक डॉ. काजल महेश्वरी यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय संकल्पनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, संघभावना, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमतेचा अनुभव मिळाला. शाश्वत उत्पादने, पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून बदलत्या व्यावसायिक संधींची ओळख विद्यार्थ्यांना झाली.”
या विद्यार्थी उद्योजकता स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, दिवाळी सजावट व साहित्य, पर्यावरणपूरक उत्पादने आणि विविध खेळ यांसारख्या नावीन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना सादर केल्या. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत विविध गुणदर्शन व आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
विशेष म्हणजे, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंसहाय्यता गट (Self-Help Groups) उपक्रमांतर्गत विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मांडण्यात आली. यामध्ये हस्तकला वस्तू, पारंपरिक उत्पादने, सणासुदीच्या भेटवस्तू आणि घरगुती खाद्यपदार्थांचा समावेश होता.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुढील टीम्स व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बेस्ट सस्टेनेबल प्रॉडक्ट टीम ‘तेरा उत्सव’ , इनेव्हेशन इन सस्टेनेबल पॅकेजिंग टीम ‘दिवाळी बाईट्स’, इको-फ्रेंडली दिवाळी डेकोरेशन टीम ‘फेस्टिव्ह बाजार’, मोस्ट स्कॅलेबल बिझनेस मॉडेल टीम ‘फेस्टोरा’ , बेस्ट बिझनेस पीच टीम ‘शुभ लाभ’ , बेस्ट डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन फॉर अ सस्टेनेबल प्रॉडक्ट टीम ‘दिवाळी नक्षत्र’ , बेस्ट डिजिटल प्रॉडक्ट डिझाईन फॉर सस्टेनेबल दिवाळी टीम ‘स्वदेस’. व्यक्तिगत स्पर्धा विजेते- मिस इथनिक एलगन्स रितिका माळी (विजेती) , शुभदा बोरसे (उपविजेती), मिस्टर इथनिक एलगन्स आयुष देवकांत (विजेता) , प्रथमेश शेटे (उपविजेता)
विद्यार्थ्यांच्या या यशस्वी व्यावसायिक उपक्रमाबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन समन्वयक डॉ. काजल महेश्वरी, डॉ. अनिशकुमार कारिया आणि स्वाती सातपुते यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

