21

महाराष्ट्रात एफडीएची (FDA) मोठी कारवाई; ९.०१ कोटींचा साठा जप्त, १९ आस्थापनांचे परवाने रद्द!
मुंबई प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: सणासुदीच्या आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न भेसळ, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ‘महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने’ (FDA) राज्यभरात मोठी धडक मोहीम राबविली आहे. या कारवाईदरम्यान एफडीएने तब्बल ९.०१ कोटी रुपये मूल्याचा ३.५३ लाख किलो अन्नपदार्थांचा संशयास्पद साठा जप्त केला असून गंभीर त्रुटी आढळलेल्या १९ अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील पतंजली आयुर्वेद कंपनीची सुपर डिस्ट्रिब्युटर असलेल्या ‘मे. दिव्या महावितरक’वर कारवाई करत भेसळ व चुकीच्या ब्रँडिंगच्या संशयावरून २०.२० लाख रुपये मूल्याचे २,२७९.७ लिटर पतंजली गायीचे तूप (४,०३२ युनिट्स) जप्त करण्यात आले. ठाणे (भिवंडी) ‘ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लि.’ (D-Mart) मधून तब्बल १,४४,२१८ किलो खाद्यतेल जप्त. सातारा ‘अमीन ट्रेडर्स’मधून २०,५६० किलो तांदूळ, डाळी, गूळ व इतर खाद्यपदार्थ जप्त; तसेच ‘स्वाती ऑइल मिल्स’मधून खाद्यतेल जप्त. सोलापूर ‘एस. जी. ट्रेडर्स’मधून खाद्यतेल जप्त. प्रतिबंधित अन्नपदार्थ २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान १७ आस्थापनांमधून ७९.४० लाख रुपयांचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त.
मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील गंभीर अस्वच्छता, कीटक नियंत्रणाचा (Pest Control) अभाव, साठवणुकीतील त्रुटी आणि अनिवार्य कागदपत्रांची अपूर्तता आढळल्यामुळे नमकीन, मिठाई व मसाले उत्पादक असलेल्या १९ आस्थापनांचे परवाने व नोंदणी तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. १३ एफआयआर (FIR) नोंदवले. १६ आरोपींना अटक. ७ आस्थापना सील करण्यात आल्या, तर ६ वाहने जप्त. नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नागपूर विभागातील ३४ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व ढाब्यांची तपासणी करून २९ जणांना कारणे दाखवा व सुधारणा नोटीस बजावण्यात आली.
याच कारवाईच्या ओघात ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने’ (FSSAI) ‘टाटा १एमजी मरीन कोलाजन पावडर’च्या (Tata 1mg Marine Collagen Powder) लेबलिंग व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी Tata 1mg, ॲमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) आणि ACFO फार्मास्युटिकल्स या बड्या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून ३० दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ही संपूर्ण कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत करण्यात आली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा एफडीए प्रशासनाने दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
