72

पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिवाळीच्या शुभेच्छांसह नोव्हेंबर महिन्यातील वाढदिवस उत्साहात साजरे!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे , दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन तसेच भेटवस्तूंचे वितरण करून नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवस अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात साजरे करण्यात आले.
या स्नेहमयी कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, कार्यवाह ईश्वरलाल चौधरी, उपाध्यक्ष मनोकार, कार्याध्यक्ष अशोक चव्हाण, रमेश काटे यांच्यासह सुमारे ४० ज्येष्ठ महिला व पुरुष सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मनःपूर्वक स्वागत केले. या बैठकीमध्ये खोपोली येथील ‘माधवबाग आयुर्वेदिक क्लिनिक’ येथे एकदिवसीय आरोग्य सहल आयोजित करण्याबाबत, आगामी दिवाळी पहाट कार्यक्रम आणि पुण्याजवळील निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी एकदिवसीय सहल काढण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठ सभासदांना संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महिला सभासद मंगल लोखंडे यांनी “बार बार ये दिन आए, तुम जिओ हजारों साल…” हे लोकप्रिय गाणे सादर करून संपूर्ण कार्यक्रमात उत्साह भरला.
याच कार्यक्रमात मराठी भाषेचे सौंदर्य आणि म्हणींचे महत्त्व सांगताना सुनील पोकरे यांनी ‘ताकाला जाऊन भांडे लपवणे’, ‘चोरांच्या उलट्या बोंबा’, ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशा अनेक लोकप्रिय म्हणींचे अर्थ रंजक शैलीत समजावून सांगितले. त्यांच्या या उपक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संघाचे प्रतिनिधी सुनील पोकरे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या व आनंदाच्या बातम्यांची माहिती दिली. १ नोव्हेंबरपासून ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीएमएल (PMPML) बस प्रवासात ५० टक्के सवलत लागू झाली असून, अवघ्या ३५ रुपयांत दैनिक पास उपलब्ध होणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून ‘जीवन प्रमाण’ ॲपद्वारे घरबसल्या ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate) कसे मिळवावे, याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन त्यांनी केले.
संघाचे ज्येष्ठ सभासद टी. एन. प्रकाशन यांच्या सौजन्याने सर्व उपस्थित सभासदांना दिवाळी भेट म्हणून सुगंधी उटणे, सुगंधी धूप, परफ्यूम आणि मातीच्या आकर्षक पणत्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभारप्रदर्शन रमेश काटे यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
