50

निंभोरा येथे पंचायत राज व्यवस्था व ग्रामसभा विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
तिवसा (अमरावती): RSCD (मुंबई) व CLGF या संस्थांच्या पुढाकाराने तसेच ग्रामपंचायत निंभोरा यांच्या सहकार्याने, ‘समताग्राम प्रकल्पा’अंतर्गत समताग्राम समिती (निंभोरा) तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभोरा येथे ‘पंचायत राज व्यवस्था, ग्रामसभा आणि विविध ग्रामविकास समित्यांची भूमिका’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला.
ग्रामविकासाची प्रक्रिया अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व सर्वसमावेशक करण्यासोबतच महिला सहभाग आणि सामाजिक समता वाढविणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.

प्रशिक्षणाचे उद्घाटन निंभोरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. मंगलाताई थोटे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. पंचायत राज प्रशिक्षक तथा महिला राजसत्ता आंदोलनाचे प्रफुल्ल मंदा श्रीधर (कुकडे) यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी संविधानातील ७३ वी घटनादुरुस्ती, पंचायत राज व्यवस्थेची रचना, ग्रामपंचायतीचे अधिकार आणि ग्रामसभेचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
ग्रामसभा हा ग्रामीण लोकशाहीचा पाया असून योजनांची निवड, विकासकामांची पाहणी आणि गावच्या प्रश्नांची सोडवणूक ग्रामसभेतूनच झाली पाहिजे. महिलांना केवळ आरक्षणापुरते मर्यादित न ठेवता निर्णयप्रक्रियेत सक्रिय करून महिलास्नेही ग्रामपंचायत घडविणे आवश्यक आहे. रस्ते, नाल्यांसोबतच गावातील प्रत्येक घटकाला समान संधी, सन्मान आणि सुरक्षितता मिळणे म्हणजे खरा विकास होय.

या प्रसंगी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे साथी संजय खापरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नशामुक्ती या विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृतीपर पत्रकांचे वाटप केले.
या प्रशिक्षणास ग्रामपंचायत सदस्य अरुण गोहत्रे, मीना गोरडे, पोलीस पाटील सुवर्णा गोरडे, सी.आर.पी. मयुरी श्याम गोहत्रे, बचत गट प्रतिनिधी, कृषी सखी प्राजक्ता शिरपूरकर, माधुरी गोरडे, ज्योती मोरे, दिलीप मोहोड, नितीन दिघडे, रेखा लांडे, पूनम पुनसे, निर्मला तालन, बेबी तालन, अरुणा गोरडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके आयोजन व संचालन समताग्राम प्रकल्पाच्या अमरावती जिल्हा समन्वयक मनुताई वरठी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्राजक्ता शिरपूरकर यांनी मानले. निंभोरा येथील हा उपक्रम ग्रामीण सक्षमीकरणासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
