40

सांगवीतील पीडब्ल्यूडी क्वार्टर्सच्या जागेवर संविधान सृष्टी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी उभारा: शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे
पिंपरी-चिंचवड / सांगवी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
सांगवी: सांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविल्याप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून आता या संपूर्ण परिसराचा व्यापक विकास करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेस आणि समविचारी पक्षांच्या आंदोलनाचा आज (दि. ३० ऑक्टोबर) नववा दिवस होता. सांगवीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) मोडकळीस आलेल्या क्वार्टर्सच्या जागेवर ‘संविधान सृष्टी’, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका आणि वसतिगृह उभारून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन सृष्टी’ विकसित करण्यात यावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
आंदोलनादरम्यान भूमिका मांडताना नरेंद्र बनसोडे म्हणाले की, “संविधान चौकातील संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प बेकायदेशीरपणे हटवून जेसीबीच्या साहाय्याने स्मारक उद्ध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे, संतोष कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच हटविण्यात आलेली संविधानाची प्रास्ताविका पुन्हा त्याच जागी सन्मानाने स्थापित केली गेली पाहिजे.”
आंदोलनादरम्यान नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांशी झालेल्या चर्चेतून सांगवी परिसरात एक व्यापक स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आणि पिंपळे निलख परिसरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे शहराध्यक्ष बनसोडे यांनी पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. संविधानाची निर्मिती, संविधानाची मूल्ये, प्रास्ताविका आणि मानवी हक्क यांची सविस्तर माहिती देणारे केंद्र उभारणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा, मोठी अभ्यासिका आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतिगृह निर्माण करणे. सांगवीतील पीडब्ल्यूडीच्या मोडकळीस आलेल्या क्वार्टर्सची जागा महानगरपालिकेने ताब्यात घेऊन त्यातील सुमारे एक एकर जागेवर हे अध्ययन केंद्र विकसित करावे.
या संपूर्ण मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय, कलासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरसचिव विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पुनर्स्थापनेपुरते हे आंदोलन मर्यादित न ठेवता, या घटनेच्या माध्यमातून शहरात संविधान जागृती, विद्यार्थी हित आणि सामाजिक प्रबोधनाचे एक मोठे केंद्र निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
