24

आंतरराष्ट्रीय अनुभव, जागतिक दर्जाचे कौशल्य महत्त्वाचे: डॉ. गोविंद कुलकर्णी
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले , दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव, शिक्षण आणि जागतिक दर्जाचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे आहे. जपानसारख्या प्रगत देशात रोजगाराच्या व उद्योगाच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. भारत आणि जपान यांच्यातील शैक्षणिक, औद्योगिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे आणि विद्यार्थ्यांना जपानमधील उच्च शिक्षण, संशोधन व व्यावसायिक संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने आयोजित केलेला ‘जपानची ओळख २०२६’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे PCCOE चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (PCCOE) च्या आंतरराष्ट्रीय संबंध विभाग आणि जपान सुविधा केंद्र यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित या उपक्रमाचे हे पाचवे यशस्वी वर्ष होते.
कार्यक्रमादरम्यान जेट्रो (JETRO) मुंबईचे महासंचालक हिसाशी मुराकामी आणि सहाय्यक संचालक नीलम भाटिया यांनी जपानमधील करिअरच्या संधी तसेच भारतीय प्रतिभेला जपानी उद्योगांशी जोडण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. येत्या नोव्हेंबर २०२६ मध्ये PCCOE येथे जपानी उद्योगविषयक विशेष परिसंवाद (Seminar) आयोजित करण्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना जपानी उद्योग जगताशी थेट संवाद साधण्याचे आणखी एक व्यासपीठ मिळणार आहे.

पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमात जपानची शिक्षण पद्धती, जपानी भाषा, औद्योगिक संस्कृती, तंत्रज्ञानातील प्रगती आणि जागतिक स्तरावरील रोजगाराच्या संधींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमास पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (PCET) अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात जपान फाउंडेशन (नवी दिल्ली) चे वरिष्ठ सल्लागार मकोतो सायतो, ॲस्टेमो एफआयईचे संचालक सुधीर गोगटे, ‘जलताप’चे संस्थापक डॉ. हरी दामले, डीजी फ्युचरटेकचे सीईओ गौतम कुलकर्णी, जपानी करिअर समुपदेशक राजेंद्र जोशी आणि फिडेल सॉफ्टटेकचे सहाय्यक उपाध्यक्ष दीपक जोशी यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यावसायिक वातावरणाची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे स्वागत PCCOE च्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत यांनी केले. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी अशा आंतरराष्ट्रीय उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले. उपस्थितांनी जपानी संस्कृती व तंत्रज्ञानावरील विविध प्रदर्शने व स्टॉल्सना भेट देऊन माहिती जाणून घेतली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
