30

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये कोट्यवधींच्या विविध विकासकामांना मंजुरी!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा नुकतीच महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात उत्साहात संपन्न झाली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील विविध प्रभाग आणि परिसरातील रस्ते विकास, दुरुस्ती, आरोग्य, शिक्षण व नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण आणि विकासात्मक प्रस्तावांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
चिंचवड येथील तालेरा रुग्णालयातील HVAC, OT आणि विद्युत विषयक यंत्रणेचे पुढील २ वर्षांसाठी चालन, देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCM) क्ष-किरण (X-Ray) विभागातील डिजिटल रेडिओग्राफी सिस्टम मशीनच्या हमी कालावधीनंतर थेट पद्धतीने सीएमसी (CMC) करण्यासाठी मूळ उत्पादक कंपनीसोबत करारनामा करण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय महिला आयटीआय कासारवाडी येथे अतिवृष्टीमुळे तातडीने साहित्य खरेदीच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्र. १६ मधील रावेत भागात ताब्यात आलेले डी.पी. व नॉन डी.पी. रस्ते विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) यांची QCBS पद्धतीने नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०२६-२७ करीता प्रभाग क्र. २२ मधील पवनानगर व आदर्शनगर परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याचे काम मंजूर झाले.

प्रभाग क्र. १९- सुदर्शननगर हेल्थ क्लब जवळील जुने सी.डी. वर्क पाडून नवीन बांधण्याच्या कामाच्या निविदेला मंजुरी., प्रभाग क्र. १५ आकुर्डी गावठाण व इतर परिसरात स्ट्रॉर्म वॉटर लाईन, फुटपाथ आणि मनपा इमारतींची स्थापत्य विषयक दुरुस्ती व फर्निचरची कामे., प्रभाग क्र. ९ व १० विविध ठिकाणी पदपथ उभारणे, नेहरुनगर, विठ्ठलनगर परिसरातील स्थापत्य कामे आणि शाहूनगर भागात रोड फर्निचर विषयक कामांना मंजुरी., प्रभाग क्र. ६, ८ आणि २० धावडेवस्ती, गुळवेवस्ती, सेक्टर १ ते ६, विशाल थिएटर, संत तुकारामनगर, कासारवाडी व एमआयडीसी परिसरातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण, स्ट्रॉर्म वॉटर चेंबर्स आणि नाल्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली., सार्वजनिक स्वच्छतागृहे प्रभाग क्र. ३, ४, १५ आणि १८ मधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉक बसवणे व दिशानिर्देश फलक लावण्याच्या निविदा स्वीकृत.
प्रभाग क्र. २ मधील कृषी उत्पन्न बाजार समिती ते सीएनजी पंप रस्ता अद्ययावत करण्याच्या कामांतर्गत स्ट्रीट लाईट, डेकोरेटिव्ह पोल आणि हायमास्ट पोल कार्यान्वित करण्यासाठी महावितरण कंपनीस सुरक्षा ठेव, सर्व्हिस चार्जेस व प्रोसेसिंग फी अदा करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच ‘ड’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध कार्यक्रमांकरिता तात्पुरत्या स्वरूपाची ध्वनिक्षेपण, सीसीटीव्ही, जनरेटर व प्रकाश व्यवस्था करण्याच्या निविदांना मान्यता देण्यात आली.
दापोडी, निगडी आणि दिघी येथील एकूण ५ मुस्लिम व लिंगायत दफनभूमींसाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, संबंधित धर्मदाय संस्थांना किमान वेतन दरानुसार १ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
प्रभाग क्र. १६, १७, १८ व २२ मधील कामांसाठी नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील ८ महिन्यांसाठी वाहन, इंधन व चालकासह मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. तसेच सांगवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विद्यार्थ्यांना दृश्याधारित शिक्षण व व्हर्च्युअल प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या ई-लर्निंग मॉड्यूल खर्चाच्या प्रस्तावाचे अवलोकन करण्यात आले.
या सर्व महत्त्वाच्या विकासकामांना स्थायी समितीने मंजुरी दिल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरी पायाभूत सुविधा अधिक गतिमान आणि बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
