20

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एसकेएफ कंपनीच्या सीएसआर उपक्रमातून स्थापन केले देशातील पहिले गव्हर्मेंट-कॉर्पोरेट कौशल्य विकास ‘सीड’ केंद्र!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: कौशल्य प्रशिक्षणाला उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांची जोड देत युवकांना थेट रोजगाराच्या संधींपर्यंत पोहोचविण्यासाठी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयटीआय (मोरवाडी) विभागाच्या सहयोगाने एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या पहिल्या ‘एसकेएफ एम्प्लॉयबिलिटी अँड आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट (सीड)’ केंद्राचा चिखलीतील जाधववाडी येथे दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. देशातील हे पहिलेच गव्हर्मेंट-कॉर्पोरेट कौशल्य विकास ‘सीड’ केंद्र ठरले आहे.
या केंद्राच्या पहिल्या तुकडीतील १०० विद्यार्थ्यांना ३०० तासांच्या विशेष अभ्यासक्रमातून ‘शॉप फ्लोअर टेक्निशियन’ आणि ‘इंडस्ट्रियल इलेक्ट्रीशियन’ या महत्त्वाच्या भूमिकांसाठी प्रशिक्षित केले जाणार आहे.
प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण, उत्पादन क्षेत्रातील सुरक्षित कार्यपद्धती, संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्त्व व कार्यस्थळ कौशल्ये, डिजिटल साक्षरता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) प्राथमिक ओळख यांचा यामध्ये समावेश असेल. केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता, विद्यार्थ्यांना नोकरी मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण सहाय्य केले जाईल. किमान दहावी, बारावी, आयटीआय व इतर शिक्षण उत्तीर्ण झालेले तरुण-तरुणी या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत. विशेषतः उत्पादन क्षेत्रातील करिअरमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
या महत्वपूर्ण कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, सहआयुक्त मनोज लोणकर, आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, विष्णू साबळे, विक्रम आळोखे, आणि सोमनाथ शिंदे उपस्थित होते.
तसेच एसकेएफतर्फे व्यवस्थापकीय संचालक सुजीथ पै, कंपनी व्यवस्थापक प्रशांत हांडे, सीएसआर व शाश्वतता प्रमुख शशी शेट्टी, सीएसआर लीड मयूर देशमुख, कम्युनिकेशन लीड प्रियंका दास; तर टाटा स्ट्राइव्हतर्फे अनिता राजन, अमेया वंजारी, प्रदीप लिंगावत, व्यंकट रायडू, श्वेता बक्शी, अक्षय शेट्टी, प्रणोती आवलेकर आणि रमेश बलवड़कर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांइतकेच कुशल मनुष्यबळ महत्त्वाचे आहे. ‘सीड’च्या माध्यमातून उद्योग आणि प्रशासनाला एकत्र आणून युवकांच्या आकांक्षांचे रोजगारक्षमतेत रूपांतर केले जात आहे.” – सुजीथ पै (व्यवस्थापकीय संचालक, एसकेएफ इंडिया)
“शहराची औद्योगिक प्रगती स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारी असावी. एसकेएफचा हा उपक्रम युवकांच्या भविष्यातील मोठी गुंतवणूक असून, यामुळे समाज आणि देश अधिक सक्षम होण्यास मदत होईल.” – महापौर रवी लांडगे
“नागरी प्रशासन आणि उद्योग यांच्या यशस्वी भागीदारीतून स्थानिक क्षमता विकसित करून कुशल मनुष्यबळ घडविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.” – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिता राजन यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती गोरे यांनी, तर मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
