32

सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या कु. आर्या कांबळेचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केट इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या प्रसंगी अद्वितीय प्रसंगावधान राखत सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या कु. आर्या विजय कांबळे (वय २०) हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान करण्यात आला.
कुणाल मार्केट इमारतीमध्ये सुमारे ४० दुकाने आणि ३८ सदनिका आहेत. पहाटे दीडच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे लक्षात येताच आर्या हिने क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखले. तिने आरडाओरडा करत इमारतीतील नागरिकांना तात्काळ सावध केले आणि सर्वांना तातडीने टेरेसवर जाण्याचा सल्ला दिला. यासोबतच तिने अग्निशमन विभागाला तातडीने फोन करून घटनेची माहिती दिली.
काहीच मिनिटांत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. टेरेसवर अडकलेल्या नागरिकांना शेजारील इमारतीत सुरक्षितपणे हलविण्यात आले. आर्याच्या या असीम धैर्यामुळे आणि समयसूचकतेमुळे सुमारे ७० नागरिकांचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली.
कु. आर्या कांबळे ही डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (आकुर्डी) येथे डिझाइन विषयाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. स्वतःचा जीव धोक्यात असतानाही इतर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तिने दाखविलेल्या शौर्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आर्या कांबळे हिने दाखविलेली धाडसी वृत्ती ही पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगत महापालिकेच्या वतीने तिचा विशेष गौरव करण्यात आला.
या गौरव सोहळ्यास शर्मिला बाबर (उपमहापौर), अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती), प्रशांत शितोळे (सत्तारूढ पक्षनेते), भाऊसाहेब भोईर (विरोधी पक्षनेते), विश्वजीत बारणे (शिवसेना गटनेते), डॉ. कुलदीप जंगम (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा) यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, नगरसदस्य आणि पालिका अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
