45

मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे आणि अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांना निलंबित करा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आक्रमक!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे आणि अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांच्यावर लाचखोरी व गैरव्यवहार प्रकरणी तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मनपा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.
या संदर्भात पक्षाचे शहराध्यक्ष देवेंद्र सहदेव तायडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना अधिकृत निवेदन सादर करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे. तसेच या चौकशीत अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांचेही नाव समोर येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. महापालिकेच्या उच्च पदांवर बसलेले अधिकारी जर कंत्राटदारांकडून लाच आणि खंडणी मागत असतील, तर शहरात कोणतेही विकासकाम गुणवत्तेनुसार होऊ शकत नाही, असा घणाघाती आरोप पक्षाने केला आहे.
महापालिकेचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी भ्रष्ट अधिकारी प्रमोद ओंबासे आणि अजय सूर्यवंशी यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात यावे.

संबंधित अधिकाऱ्यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नियुक्तीपासून आजपर्यंतच्या सर्व मालमत्तेची, बँक खात्यांची तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची सखोल चौकशी केली जावी. अथांग मालमत्ता आणि बेकायदेशीर माया जमवल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर गुन्हे दाखल करावेत.
प्रशासकीय कामकाजावर सर्वसामान्य नागरिकांचा अविश्वास निर्माण होऊ नये यासाठी आयुक्तांनी या विषयात स्वतः लक्ष घालून तात्काळ निष्पक्ष कार्यवाही करावी. जर प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर तीव्र ‘घंटा नाद’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिला आहे.
या निवेदनावर जयंत शिंदे, राजू खंडागळे, काशिनाथ जगताप, संतोष शिंदे, नितीन कुमारने यांच्यासह पक्षाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
