25

सासवड शहरात फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा; महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाची मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याशी भेट!
सासवड / पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३१ ऑक्टोबर २०२६
सासवड: सासवड नगरपरिषद हद्दीतील पथारीवाले, हातगाडीधारक आणि स्टॉलधारकांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांना कायदेशीर फेरीवाला प्रमाणपत्र द्यावे, तसेच पथविक्रेता कायद्यानुसार आवश्यक सुविधा व लाभ उपलब्ध करून द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाने सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
शहरातील फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे, त्यांच्या व्यवसायाची अधिकृत नोंदणी व्हावी आणि कायद्यानुसार त्यांच्या उपजीविकेचे हक्क सुरक्षित राहावेत, या मुद्द्यांवर यावेळी विशेष भर देण्यात आला.
शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्या आणि फेरीवाला कायद्याच्या कडक अंमलबजावणीबाबत मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवली. फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी पुढील १५ दिवसांत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या शिष्टमंडळात महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सरचिटणीस तुषार घाटुळे, सासवड शहराध्यक्ष दिलीप गाढवे, अमित चिंबळकर, सुनील भुतकर, प्रदीप जैनक, अक्षय पोटे, शुभांगीताई कोलते, अमित पवार, राहुल आगवणे, चैत्राली जगताप, सुशील भंडे, लाला राठोड, राजेश माने आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फेरीवाल्यांना कायदेशीर हक्क, सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी आणि शासनाकडून मिळणाऱ्या आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी महासंघाच्या वतीने आगामी काळातही जोरदार पाठपुरावा सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्धार शिष्टमंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
