17

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची ‘विनम्र अभियान पदयात्रा’ यशस्वी; महापौर रवी लांडगे यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस व वेतन अदा करण्याचे आदेश!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर काढण्यात आलेली “विनम्र अभियान पदयात्रा” अत्यंत यशस्वी ठरली आहे. या पदयात्रेनंतर यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस आणि वेतनाबाबत सकारात्मक चर्चा केली. कामगारांच्या रास्त मागण्यांची तात्काळ दखल घेत महापौर रवी लांडगे यांनी ३ नोव्हेंबर २०२६ च्या आत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व वेतन अदा करण्याचे परिपत्रक काढण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना दिले आहेत.
भिमसृष्टीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ‘विनम्र अभियान पदयात्रेला’ उत्साहात सुरुवात करण्यात आली. या पदयात्रेत हजारो कामगार व कर्मचारी सहभागी झाले होते. कामगारांच्या विविध घोषणांनी पिंपरी महापालिका मुख्यालय परिसर दुमदुमून गेला होता.

पदयात्रेदरम्यान यशवंतभाऊ भोसले यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत सुमारे ४ हजार ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या मागण्या मांडल्या. आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी, वाहन चालक, वैद्यकीय विभागातील स्वच्छता सेवक, वॉर्ड बॉय, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी. उद्यान विभाग, अग्निशमन विभागातील वाहनचालक व जवान, पालिकेच्या शाळांतील स्वच्छता सेवक, शिपाई, स्मशानभूमी कर्मचारी, तसेच पाणीपुरवठा व जलवाहिनी विभागातील सर्व कर्मचारी. या सर्व ४,५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’ लागू करण्यात यावे. महापालिकेने कामगारांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचा कौटुंबिक आरोग्य विमा उतरावावा. कामगाराचा अपघाती किंवा आजाराने मृत्यू झाल्यास वारसदारास २५ लाख रुपयांची भरपाई मिळावी व अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत नोकरी दिली जावी.
महापौर रवी लांडगे यांनी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या लढ्याचे कौतुक करत सांगितले की, “दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रत्येक कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचाऱ्याला बोनस मिळालाच पाहिजे. आचारसंहितेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने, बोनस संदर्भातील परिपत्रक आज संध्याकाळी किंवा सोमवारी सकाळपर्यंत प्रसिद्ध केले जाईल.”
काही कंत्राटदार पगारातच बोनस समाविष्ट असल्याचे सांगून पळवाट काढतात, अशा कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. तसेच समान काम समान वेतन आणि मानधनावरील नर्सेसच्या प्रश्नावर सोमवारी किंवा मंगळवारी स्वतंत्र बैठक आयोजित करून मार्ग काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
“दिवाळीपूर्वी बोनस अदा करण्याचे सकारात्मक आदेश दिलकाबद्दल हजारो कंत्राटी कामगारांच्या वतीने मी महापौर रवी लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. महापौरांनी घेतलेल्या या संवेदनशील निर्णयामुळे हजारो कामगारांच्या घरात दिवाळीचा आनंद पोहचणार आहे.”— यशवंतभाऊ भोसले (संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
