33

संगीताच्या सुरातून माणुसकीचा स्वर; ‘स्वरांजली’त ज्येष्ठ कलाकाराचा सत्कार आणि मदतीचा हात!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील माणसांना जोडणारे आणि संवेदनशीलतेची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे, याचा प्रचिती अमरावती येथे आयोजित ‘आजा सनम मधुर चाँदनी में हम’ या सांगीतिक कार्यक्रमातून आली. SIMS द्वारा संचलित सा इंटरनॅशनल म्युझिक अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) सांस्कृतिक भवन येथे आयोजित या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकाराला आर्थिक मदत करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्याचा सामाजिक उपक्रम या संगीतसंध्येचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.
स्वरसम्राट मन्ना डे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात सा इंटरनॅशनल म्युझिक अकॅडमीच्या कलाकारांसह महिला महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

संगीत क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ तबलानिर्माते श्री. सुरेश भाऊ लांडगे यांचा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि रोख आर्थिक मदत देऊन गौरव करण्यात आला.
कलाकारांच्या योगदानाचा लाभ समाजाला अनेक वर्षे मिळत असतो; मात्र त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना आधार देण्याची जबाबदारीही समाजाने स्वीकारली पाहिजे, या भूमिकेतून करण्यात आलेला लांडगे यांचा सन्मान उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाला. यावेळी आरोग्यम हॉस्पिटलचे संचालक किरण हातगावकर, ज्येष्ठ विधिज्ञ वासुदेव नवलानी, सा इंटरनॅशनल म्युझिक अकॅडमीच्या अध्यक्षा सौम्या स्नेहाशिष दास, प्रमुख गायक प्रा. डॉ. स्नेहाशिष दास आणि ॲड. मिलिंद जोशी उपस्थित होते. प्रा. विद्या व्यास यांनी प्रास्ताविक केले, तर ॲड. मिलिंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात प्रा. डॉ. स्नेहाशिष दास यांनी ‘सुर ना सजे, क्या गाऊँ मैं’, ‘तू प्यार का सागर है’, ‘ज़िन्दगी कैसी है पहेली’, ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया’, ‘कसमें वादे प्यार वफ़ा’, ‘पूछो ना कैसे मैंने रैन बिताई’ आणि ‘तुझे सूरज कहूँ या चंदा’ ही लोकप्रिय गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.
याशिवाय सौ. सविता पडोळे, प्रा. स्मिता पाटील, सौ. जान्हवी बल्लाळ, स्वरमयी चौधरी, डॉ. जयश्री नांदुरकर, कु. निकिता मोने, कु. राधा बनकर, श्रीमती विद्या व्यास, सौ. अमृता वाठोडकर, श्रीमती छाया अग्रवाल, ॲड. मिलिंद जोशी आणि चि. आयुष तिवारी यांनी विविध युगलगीते व एकल गीते सादर करून संगीतसंध्या उत्तरोत्तर रंगवली. रामेश्वर काळे व त्यांच्या संचाने संगीत संयोजन केले.
महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुलदीपसिंह मोहाडिकार आणि नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. अनुभवी कलाकारांसोबत रंगमंचावर सादरीकरण करण्याची संधी मिळण्यासोबतच गरजू कलाकारांच्या पाठीशी उभे राहण्याची सामाजिक संवेदनशीलता या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
