51

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास सक्त मनाई; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे कडक आदेश!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने नागरिक, कंत्राटदार (ठेकेदार) अथवा कोणत्याही संस्थांकडून कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू, देणग्या किंवा बारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारू नये, असे कडक आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. याबाबत त्यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासकीय व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील कलम १२ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही भेटवस्तू (Gift) किंवा देणगी स्वतः स्वीकारता कामा नये. अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने आपल्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा स्वतःच्या वतीने काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अशा भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये. कलम १२ मधील टिप-२ नुसार, कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून, कंत्राटदाराकडून किंवा औद्योगिक व वाणिज्यिक संस्थांकडून वारंवार केला जाणारा पाहुणचार स्वीकारणे पूर्णपणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिकेच्या सुरक्षा विभागानेदेखील सतर्क राहावे. महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा गिफ्ट्स घेऊन येणाऱ्या बाहेरील व्यक्तींना महापालिका इमारतीमध्ये प्रवेश देण्यापासून थेट मज्जाव करावा, असे स्पष्ट आदेश सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले आहेत.
दिवाळी आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हे अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक काढून पारदर्शक कारभाराचा संदेश दिला आहे. नियमांचे उल्लंघन करून भेटवस्तू स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर थेट शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई केली जाईल.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
