24

चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने सुटली टेरेसवरील १५ जणांची सुखरूप सुटका!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: चिंचवड येथील मध्यवर्ती चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवार (दि. २९ ऑक्टोबर) मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. आगीचे रौद्ररूप पाहून इमारतीतील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. मात्र, घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वेळेवर बचावकार्य राबवल्याने टेरेसवर अडकलेल्या १५ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून मोठी जीवितहानी टळली आहे.
आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरल्यामुळे जीव वाचवण्यासाठी रहिवाशांनी टेरेसच्या दिशेने धाव घेतली होती. यामध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि काही आजारी रुग्णांचा समावेश होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्य अग्निशमन केंद्रासह प्राधिकरण, थेरगाव आणि नेहरूनगर अग्निशमन केंद्रांमधून एकूण ४ अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी धुराच्या वेढ्यात अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने मोहीम राबवून टेरेसवर अडकलेल्या सर्व १५ नागरिकांना सुखरूप खाली आणले. या दुर्घटनेदरम्यान जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी तात्काळ तालेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या भीषण आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १७ दुचाकी, २ चारचाकी वाहने, एक सायकल तसेच इमारतीचे काही इलेक्ट्रिकल वायरिंग साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून महापालिका व पोलीस यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.
“अशा प्रकारच्या आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता शांतता राखावी आणि तात्काळ अग्निशमन दलाच्या १०१ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. फोनवर घटनेचे अचूक ठिकाण व परिस्थितीची स्पष्ट माहिती द्यावी. तसेच आग लागलेल्या ठिकाणी विनाकारण गर्दी न करता अग्निशमन दलाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.”— अग्निशमन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
