27

घरकुल येथे देशी रोपांचे भव्य वृक्षारोपण; समर्थ हाऊसिंग सोसायटी व अरुण पवार यांचा पर्यावरणपूरक उपक्रम!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
चिखली: समर्थ हाऊसिंग सोसायटी एफ१६ (घरकुल, चिखली) आणि मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष, वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांच्या संयुक्त विद्यमाने घरकुल परिसरात विविध प्रकारच्या देशी रोपांचे अत्यंत उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व हरित क्षेत्र वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील रहिवाशांनी कौतुक केले आहे.
या उपक्रमांतर्गत पिंपळ, आवळा, वड, चिंच, कडुलिंब, आंबा, जांभूळ, करंज यांसारख्या बहुगुणी देशी झाडांसह भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या आणि फळझाडांच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.
या पर्यावरणपूरक कार्यक्रमास समर्थ हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अशोक मगर, मीनाताई मोहिते, सुभाष लांडगे, लक्ष्मण जाधव, रंगनाथ आवारे, बिभीषण पवार, सुग्रीव पाटील, चतुरभुज चव्हाण यांच्यासह सोसायटीचे सर्व सभासद आणि स्वामी महिला बचत गट व समर्थ महिला बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपस्थित रहिवाशांनी अरुण पवार यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनापासून आभार मानले, तसेच केवळ वृक्षारोपण करून न थांबता ही सर्व झाडे दत्तक घेऊन ती सुरक्षितपणे जगवण्याचा आणि जोपासण्याचा ठाम संकल्प केला.

अरुण पवार यांनी पर्यावरणासाठी वाहून घेतले असून नुकतीच त्यांनी जांबवडे (भंडारा डोंगर पायथा) या भागामध्ये १,००० झाडांचे वृक्षारोपण केले आहे. आजपर्यंत त्यांनी राज्यभरात ५० हजारांहून अधिक झाडे लावून ती केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष पाणी घालून मोठी केली आहेत.
जे नागरिक किंवा सामाजिक संस्था वृक्षारोपण करण्यास उत्सुक असतात, त्यांना ते स्वतः देशी, फळझाडे आणि फुलझाडांची रोपे विनामूल्य पुरवतात. नागरिकांनी लावलेली झाडे आवर्जून जपली पाहिजेत, असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो.
“दुष्काळावर मात करण्यासाठी आणि वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जपली पाहिजेत. आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत, तेवढी किमान झाडे प्रत्येकाने लावायला हवीत. ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना प्रत्येक कुटुंबाला बंधनकारक करण्याचे आवाहन आम्ही कोरोना काळातच जिल्हाधिकारी, वन विभाग आणि महापालिका प्रशासनाला केले होते. प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली तर निसर्ग आणि पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होईल.”— अरुण पवार (संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
