news
‘अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत हेवन अकादमीच्या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक विजय’; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव!‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!‘तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी व कष्टकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका’; रांजणीत आंदोलकांचा प्रशासनाला थेट इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘पदवीधर निवडणुकीच्या पराभवावरून चिखलफेक थांबवा, आत्मपरीक्षण करा’; भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर आक्रमक!

‘पदवीधर निवडणुकीच्या पराभवावरून चिखलफेक थांबवा, आत्मपरीक्षण करा’; भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर आक्रमक!

भाजपच्या पक्षसंस्कृतीत मित्रपक्षांचा सन्मान महत्त्वाचा; सोशल मीडियावरील विनाकारण वाद टाळून समन्वयाने काम करण्याचा सल्ला | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महायुतीतील मतभेद सोशल मीडियावर नकोत; धमकीची भाषा टाळून समन्वयातून मार्ग काढा: भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि प्रवक्त्यांमध्ये निर्माण होणारे मतभेद सार्वजनिक व्यासपीठावर किंवा सोशल मीडियावर चव्हाट्यावर आणण्याऐवजी परस्पर समन्वयाने सोडवावेत. मित्रपक्षातील प्रवक्त्यांना थेट धमकी देण्याची भाषा अजिबात योग्य नाही. रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांना दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संयम बाळगून आपले प्रश्न वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सोडवावेत, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मांडली आहे.
काळभोर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, आपण सर्वजण महायुती सरकारमध्ये एकत्र काम करत आहोत. त्यामुळे राजकीय मुद्द्यांवर चर्चा करताना प्रत्येकाने संयम आणि परस्पर आदर राखणे नितांत गरजेचे आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये काही विषयांवर मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात; परंतु त्यावरून टोकाची भूमिका घेणे किंवा सोशल मीडियावर थेट धमक्या देणे योग्य नाही. अशा प्रकारच्या वादांमुळे अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षांना आयते कोलीत मिळते.
महायुती सरकारमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही घटक पक्षाला एखाद्या नेत्याबद्दल, प्रवक्त्याबद्दल किंवा कार्यकर्त्याबद्दल काही आक्षेप किंवा शंका असल्यास, संबंधित मुद्दा समन्वय समितीसमोर किंवा वरिष्ठ नेत्यांसमोर मांडावा, असे काळभोर यांनी सुचवले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अन्य वरिष्ठ सहकारी नेत्यांशी चर्चा करून सर्व गैरसमज दूर केले जाऊ शकतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडणे अधिक उचित ठरेल. सोशल मीडियावर विनाकारण आरोप-प्रत्यारोप करून महायुतीच्या एकोप्यात मिठाचा खडा टाकू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपली संस्कृती आणि परंपरा जपणारा पक्ष आहे. मित्रपक्षांतील नेते, आमदार, खासदार, मंत्री, प्रवक्ते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आदर करणे हा भाजपच्या संस्कारांचा भाग आहे. नवनाथ बन हे भाजपचे अधिकृत प्रवक्ते असल्याने त्यांचाही योग्य सन्मान राखला गेलाच पाहिजे, असे काळभोर यांनी आवर्जून नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकमेकांचा आदर राखावा, ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. एकनाथ भाई शिंदे हे आमचेही नेते आहेत. त्यांच्या तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाचा आणि योगदानाचा आम्ही नेहमीच आदर करतो. त्यामुळे कोणताही गैरसमज असल्यास तो वरिष्ठ पातळीवर चर्चेतून सहज दूर होऊ शकतो.”
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिता जाधव यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अशा प्रकारचे वाद वाढवून विसंवाद निर्माण करण्यापेक्षा, त्या पराभवातून योग्य ते धडा घेण्याची गरज आहे. पराभवाची कारणे शोधणे, महायुतीतील समन्वयातील त्रुटी तपासणे आणि भविष्यातील निवडणुकांसाठी अधिक प्रभावी रणनीती आखणे सध्या जास्त महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महायुतीतील नेत्यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर चिखलफेक करण्याऐवजी थेट संवादाचा मार्ग अवलंबावा. कोणतीही तक्रार किंवा मतभेद असल्यास ते पक्षाच्या वरिष्ठ नेतृतापर्यंत पोहोचवावे. धमकी, आरोप-प्रत्यारोप आणि टोकाच्या विधानांमुळे महायुतीचा एकोपा कमकुवत होऊ शकतो आणि त्याचा फायदा विरोधकांना मिळू शकतो. त्यामुळे सर्वांनी संयमाची भूमिका स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन सचिन काळभोर यांनी शेवटी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!