news
‘अडीच हजार स्पर्धकांना मागे टाकत हेवन अकादमीच्या खेळाडूंचा राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक विजय’; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव!‘कामगारांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही, पालिकेतून कायमचे ब्लॅकलिस्ट करणार’; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप!‘देशाची एकता आणि अखंडता जपण्याचा महापालिकेत दृढ संकल्प’; सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी सोहळा संपन्न!‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!‘तीन जिल्ह्यांतील लाखो शेतकरी व कष्टकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका’; रांजणीत आंदोलकांचा प्रशासनाला थेट इशारा!
Home पिंपरी चिंचवड ‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!

‘सत्ता असली तरी जनतेच्या हिताशी तडजोड नाही; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा तीव्र जनआंदोलन’; शितल शिंदे यांचा थेट इशारा!

बीआरटीचा फज्जा, कचऱ्याचे साम्राज्य आणि नदीपात्र बुजविण्याच्या षड्यंत्रावरून प्रशासनाला घरचा आहेर; नगरसेवकाच्या रोखठोक भूमिकेचे कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अधिकारी-ठेकेदार-बिल्डरांच्या संगनमताने शहराचा विनाश; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भ्रष्ट व मनमानी कारभारावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शितल (विजय) शिंदे यांचा तीव्र संताप!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या अधिकारी, ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांचे अभद्र संगनमत सुरू असून प्रशासनाचा कारभार संपूर्णपणे भ्रष्ट आणि बेलगाम झाला आहे. शहरात अनधिकृत बांधकामांचा सुटलेला सुळसुळाट, भूखंड घोटाळे, बीआरटी व कचरा व्यवस्थापनाचा उडालेला बडगा, रुग्णालयांकडून होणारे कामगार शोषण आणि नागरी सुविधांची झालेली दैना या सर्व गंभीर विषयांवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक शितल (विजय) शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांनी या सर्व घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
नगरसेवक शितल (विजय) शिंदे यांनी निदर्शनास आणलेले प्रमुख गंभीर मुद्दे-
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील गरवारे कंपनीच्या भूखंडावर ‘आय टू R’ (I to R) प्रकल्प राबविताना नियमानुसार महापालिकेला मिळणारा मुख्य रस्त्याकडील (Highway Front) नागरी सुविधा/अमेनिटी भूखंड सोडून, अधिकाऱ्यांशी संगनमत करून पाठीमागील कोपऱ्यातील कमी मूल्याचा भूखंड महापालिकेच्या माथी मारण्यात आला आहे. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले असून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. या नगररचना व बांधकाम विभागातील संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

 

चिंचवड येथील ‘गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ (प्लॉट नं. २५, सर्व्हे नं. २६९) मध्ये मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. TDR, Incentive FSI व Ancillary FSI च्या नावाखाली तब्बल ३३६ चौ.मी. पेक्षा जास्त अतिरिक्त क्षेत्रफळाचा वापर करून संपूर्ण एक मजला बेकायदेशीरपणे बांधण्यात आला. हा मजला विकून सुमारे २.५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. याचे तातडीने तांत्रिक ऑडिट करून बिल्डर (मोरया असोसिएट्सचे भागीदार – तेजस इंगवले व सुरेश पाटील) आणि संबंधित आर्किटेक्टवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

 

चिंचवड येथील ‘लोकमान्य हॉस्पिटल’ प्रशासनाकडून धर्मदाय नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून गरीब रुग्णांना हक्काच्या मोफत/सवलतीच्या खाटा नाकारून लूट सुरू आहे. तेथे कार्यरत असणाऱ्या नर्सिंग, वार्डबॉय, स्वच्छता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महिनोन्‌महिने वेतन थकीत ठेवून अमानुष शोषण केले जात आहे. तसेच, जुन्या इमारतीवर विना-स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असलेल्या धोकादायक बेकायदेशीर बांधकामामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विनापरवाना कॅन्टीन आणि पार्किंगअभावी होणारी वाहतूक कोंडी यावर महापालिकेने तात्काळ ‘काम थांबवा’ (Stop Work Notice) आदेश जारी करावा.

 

शहरातील बीआरटी मार्ग बंद पडल्यामुळे आणि नियोजनशून्यतेमुळे दैनंदिन वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून या जीवितहानीला महापालिकेचे डोळेझाक करणारे अधिकारीच जबाबदार आहेत.

 

शहरातील कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. कचरा गाड्यांचे कोणतेही नियोजन नाही. ५ ते ६ दिवस कचरा उचलला जात नसल्याने शहरात दुर्गंधी व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

 

करदात्या नागरिकांच्या पैशांतून बनवलेल्या ‘स्मार्ट रस्त्यांवर’ अतिक्रमणे वाढली आहेत. शहरात सर्रासपणे नदीपात्र बुजवण्याचे काम सुरू असून, महापालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणे करून त्याद्वारे लाखो रुपयांचे घोटाळे अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने सुरू आहेत.

 

प्रशासकीय कालावधी संपल्यानंतरही अधिकाऱ्यांची ती मनमानी मानसिकता अजूनही संपलेली नाही. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांचे ऐकून न घेणे, विकासकामांमध्ये नागरिकांना व नगरसेवकांना विश्वासात न घेणे आणि फक्त स्वतःचे खिसे भरणे हाच अधिकाऱ्यांचा एकमेव अजेंडा बनला आहे.

 

नवीन आयुक्त आल्यापासून आतापर्यंत तब्बल १२ अधिकारी लाच घेताना रंगेहात सापडून निलंबित झाले आहेत. प्रशासनाचा अधिकाऱ्यांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही. तसेच मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातही प्रदूषण व सुरक्षेच्या कारणास्तव आठवड्यातून एक दिवस बांधकाम बंद ठेवण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.

 

“पिंपरी-चिंचवड महापालिका ही नागरिकांच्या सेवेसाठी आहे, अधिकारी आणि बिल्डरांच्या वसुलीसाठी नाही! जर प्रशासनाने या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी, बिल्डर आणि ठेकेदारांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली नाही, तसेच अनधिकृत कामांवर ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली नाही, तर संपूर्ण शहरातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल!”
— शितल (विजय) शिंदे (ज्येष्ठ नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वतःची सत्ता (भारतीय जनता पक्षाची सत्ता) असूनही, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, भ्रष्टाचाराविरोधात आणि शहराच्या विकासासाठी नगरसेवक शितल (विजय) शिंदे यांनी नेहमीप्रमाणे घेतलेली ही आक्रमक आणि रोखठोक भूमिका शहरात कौतुकाचा विषय ठरत आहे. सत्ताधारी पक्षात असतानाही पक्षाच्या किंवा महापालिकेच्या चुकीच्या कारभारावर कसलाही संकोच न बाळगता थेट बोट ठेवण्याच्या त्यांच्या या कणखर भूमिकेमुळे जनसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत लोकप्रिय, अभ्यासू आणि लाखात एक नगरसेवक अशी अधिक उजळून निघाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!