45

लवासा आणि सहारा सिटी प्रकल्पाबाबत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे वक्तव्य अज्ञानावर आधारित; मारुती भापकर यांनी थेट विचारला जाब!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: रायगड जिल्ह्यातील कर्जत-भीमाशंकर येथील टोरंट जलविद्युत प्रकल्प आणि उजनी धरण क्षेत्रातील एआय (AI) डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, हायड्रोजन व अणुऊर्जा प्रकल्पांविरोधात शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या आंदोलनांना पिंपरी-चिंचवडमधील जन चळवळीचे नेते माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या विनाशकारी प्रकल्पांच्या समर्थनात बोलताना महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी लवासा आणि सहारा सिटीबाबत केलेले वक्तव्य अज्ञानातून आणि चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे सांगत मारुती भापकर यांनी त्यांना प्रत्यक्ष गाठून जाब विचारला.
कर्जत-भीमाशंकर येथील वृक्षतोडीवर आणि उजनीतील प्रकल्पांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विरोधक फेक नॅरेटिव्ह सेट करत आहेत’ असे विधान केले होते. त्यानंतर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, चित्रा वाघ, नवनाथ बन आदी नेत्यांनी या प्रकल्पांचे समर्थन सुरू केले. यातच राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी “वृक्षतोडीविरोधात ओरडणारे आंदोलनकर्ते लवासा लेक सिटी व सहारा सिटी प्रकल्प उभारले जात होते तेव्हा कुठे झोपले होते?” असे जाहीर वक्तव्य केले होते.
पुण्यातील औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिरात ‘अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन’च्या वतीने ‘कर्तुत्ववान मराठा दुर्गा’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, समाजसेविका डॉ. ज्योती मेटे यांच्यासह मारुती भापकर यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी मारुती भापकर यांनी राज्यमंत्री बोर्डीकर यांची भेट घेऊन त्यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला.
“लवासा प्रकल्पाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलने केली होती. आमच्यावर गुन्हे आणि पोलीस केसेस दाखल झाल्या आहेत. लवासा प्रकल्प हा तब्बल १७ गावांमध्ये होणार होता, परंतु आमच्या तीव्र संघर्षामुळे केवळ १-२ गावे बाधित झाली आणि उर्वरित गावांमध्ये तो प्रकल्प होऊ शकला नाही.” सत्ता आणि पक्षीय भेद विसरून एक सजग नागरिक म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास करणारे, शेतकरी व कष्टकऱ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणारे प्रकल्प सत्तेच्या जोरावर जनतेच्या माथी मारले जाऊ नयेत.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर यांनी “लवासा आणि सहारा प्रकल्प खाजगी होते, मात्र जलविद्युत प्रकल्पाचा फायदा थेट नागरिकांना होणार आहे” असे सांगून प्रकल्पाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र भापकर यांनी सत्तेच्या जोरावर होणाऱ्या या विनाशाविरुद्ध आमचा लढा असाच सुरू राहील, असे ठामपणे सांगितले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

