23

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: पुणे शहराच्या विकासाला आणि शहरातील वाहतुकीला पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे मोठी नवी गती मिळणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पुण्यातील प्रमुख आयटी क्षेत्राला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभेल, तसेच शहरातील जुन्या आणि नव्या भागांमधील संपर्क अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिका-३’ चे लोकार्पण आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-२’ च्या भूमिपूजन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. या भव्य कार्यक्रमास राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री मनोहर लाल (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुणे हे आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा, स्टार्टअप आणि उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याचे नमूद करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, “२०१४ मध्ये देशात केवळ २४८ किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होते, जे आज सुमारे १२०० किलोमीटरपर्यंत विस्तारले आहेत. २६ शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू असून दररोज एक कोटीहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत. महाराष्ट्रात २०१४ मध्ये १० ते ११ किलोमीटर असणारे मेट्रो जाळे आज सुमारे २०० किलोमीटरवर पोहोचले असून ६८० किलोमीटरहून अधिक मार्गांची कामे सुरू आहेत.”
हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलवर उभारण्यात आला असून, शहरांची स्पर्धात्मकता आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्रातील प्रतिकूल हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र व राज्य सरकार संवेदनशीलतेने उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मनोगतात म्हणाले की, “पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश (PMR) परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बस, रिंगरोड आणि नव्या विमानतळासह आधुनिक वाहतूक सुविधांचे जाळे उभारले जात आहे. या पायाभूत सुविधांच्या जोरावर २०३० पर्यंत हा परिसर देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल.”
शिवाजीनगर-हिंजवडी हा देशातील पहिला पीपीपी (PPP) तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प असून, टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी डीबीओटी तत्त्वावर याची उभारणी केली आहे. या प्रकल्पाच्या संचालनात महिलांचे योगदान मोठे असून ही ‘पिंक पॉवर्ड’ मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे उत्तम प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे-३ हा मेट्रो प्रकल्प पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कलाटणी देणारा आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करणारा ठरेल. प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णत्वामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मार्गिका-३ ही देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार असून, यात सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत असणार आहेत. हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. तसेच हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष टास्क फोर्स कार्यरत करण्यात आला आहे. – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “हिंजवडी ते शिवाजीनगर २३ किमी मार्गिकेमुळे पुणे मेट्रोचे जाळे ५५ किमीपर्यंत विस्तारले आहे. तसेच खडकवासला–खराडी, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली आणि मानिकबाग–नळस्टॉप या नव्या ४६ किमीच्या मार्गांमुळे पूर्व, पश्चिम व दक्षिण भागांची जोडणी अधिक सक्षम होईल.”
मार्ग माण-हिंजवडी ते शिवाजीनगर (एकूण लांबी: २३.२०३ किमी), उन्नत स्थानके २३, स्वरूप देशातील पहिला सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP-DBFOT) तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प. खर्च सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये. विशेष वैशिष्ट्य देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित ‘पिंक मेट्रो’ (९० महिला चालक व ५०% महिला कर्मचारी).
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
