news
Home पुणे ‘महिला शक्तीचे भव्य दर्शन आणि आयटीयन्सचा उत्साह’; पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या पहिल्या प्रवासाने जिंकली पुणेकरांची मने!

‘महिला शक्तीचे भव्य दर्शन आणि आयटीयन्सचा उत्साह’; पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या पहिल्या प्रवासाने जिंकली पुणेकरांची मने!

'पिंक मेट्रो'चे प्रगती बिरादार व ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनी केले यशस्वी सारथ्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मेट्रो-३ वरील पहिल्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थिनी व आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद; स्वतः पहिले तिकीट काढून केला प्रवास!

पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: पुणे मेट्रोच्या नव्या ‘मार्गिका-३’ चे भव्य उद्घाटन आणि ‘पुणे मेट्रो टप्पा-२’ च्या भूमिपूजन सोहळ्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल (बालेवाडी) ते हिंजवडी फेज-२ दरम्यान मेट्रोने प्रत्यक्ष प्रवास केला. या नव्या मार्गावरील पहिले तिकीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः खरेदी करून मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला.
प्रवासादरम्यान पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्री व मान्यवरांना मेट्रो मार्ग, नवीन स्थानके आणि प्रकल्पाच्या विविध आधुनिक वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती दिली.

या ऐतिहासिक प्रवासात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रांतील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

या मेट्रो प्रवासाचे सर्वात मोठे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण ‘पिंक मेट्रो’चे संचालन महिला कर्मचाऱ्यांच्या हाती होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी अत्यंत कुशलतेने मेट्रोचे सारथ्य केले. ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. महिला कर्मचाऱ्यांच्या या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिला शक्तीच्या कौशल्याचे आणि कर्तृत्वाचे भव्य दर्शन घडले.

बालेवाडी ते हिंजवडी फेज-२ दरम्यानच्या सुमारे ६ किलोमीटरच्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोतील शाळकरी विद्यार्थिनी आणि आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींशी (ITians) दिलखुलास संवाद साधला.
मेट्रो प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव, मेट्रो स्थानकांवर उपलब्ध असणाऱ्या सोयी-सुविधा आणि या नव्या मेट्रो मार्गामुळे दैनंदिन वाहतूक कोंडीतून होणारी सुटका याविषयी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून थेट अभिप्राय जाणून घेतले. महिला ट्रेन पायलटचे नेतृत्व आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी साधलेला हा संवाद यामुळे उद्घाटनानंतरचा हा पहिला प्रवास अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि खास ठरला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!