35

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास!
पिंपरी-चिंचवड / पुणे प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘पुणे मेट्रो लाइन ३’ च्या प्रवासी सेवेला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी (४ नोव्हेंबर) प्रत्यक्ष सेवा सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी तब्बल ५० हजार प्रवाशांनी या मार्गावरून सुखरूप प्रवास केला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शहरातील बहुतांश आयटी कंपन्या, कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापने बंद असतानाही पुणेकरांनी मेट्रो प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर नियमित कामकाज सुरू झाल्यावर या मेट्रो मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत आणखी मोठी वाढ होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
या नव्या मार्गावर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण ठरले. या एकमेव स्थानकावरून दिवसभरात सुमारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. पुणे रेल्वे स्थानकासह शहराच्या सर्व प्रमुख भागांना जोडणारे हे मध्यवर्ती जंक्शन असल्याने येथे प्रवाशांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.

पुढील दोन आठवड्यांत कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवाशांची वाढणारी संभाव्य गर्दी विचारात घेऊन पुणे आयटी सिटी मेट्रो रेल प्रशासनाने फेऱ्यांच्या वेळापत्रकात विशेष नियोजन केले आहे. गर्दीची वेळ (Peak Hours): दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार. दर ८ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल. हिंजवडी ते शिवाजीनगर हा संपूर्ण प्रवास अवघ्या ४० मिनिटांत पूर्ण होणार असल्याने आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नियमित नोकरदारांचा प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) या एकाच कार्डच्या माध्यमातून पुणे मेट्रोच्या सर्व मार्गांवर डिजिटल प्रवास करता येत असल्याने प्रवाशांनी या सुविधेचे मनापासून स्वागत केले. पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी मेट्रोमधून स्वतःची सायकल वाहून नेण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे मेट्रो स्टेशनवरून अंतिम टप्प्यातील (Last Mile Connectivity) प्रवास करणे सायकलपटूंसाठी अधिक सोयीचे झाले आहे.
“पहिल्याच दिवशी पुणेकरांकडून मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहून अत्यंत आनंद झाला. मेट्रोची उत्तम कनेक्टिव्हिटी, आरामदायी प्रवास आणि वेळेची बचत या तीन प्रमुख वैशिष्ट्यांचे नागरिकांनी स्वागत केले आहे. पुणेकरांना सुरक्षित, वेगवान आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”— अनिल कुमार सैनी (मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
