7

‘माणुसकीची दिवाळी’; दुष्काळग्रस्त लातूर, धाराशिवमधील शेतकऱ्यांसोबत साजरी!
लातूर / धाराशिव प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ५ नोव्हेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण! मात्र, सततच्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या घरात यंदा आनंदाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ, मानवतावादी जनशक्ती आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माणुसकीची दिवाळी’ हा अत्यंत संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मासुर्डी गावासह धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्यासोबत ही दिवाळी अत्यंत आपुलकीने साजरी करण्यात आली.
या प्रेरणादायी उपक्रमात मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेश स्वामी, कामगार नेते तथा कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रमेश पिंपरे, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, उपाध्यक्ष राजेश माने, चंद्रकांत कुंभार, लाला राठोड, विशाल सरोदे, सुनील भोसले, समशुद्दीन शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या विशेष उपक्रमांतर्गत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आवश्यक अन्नधान्याचे किट, दिवाळीचा खमंग फराळ आणि नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.
हा केवळ मदत वाटपाचा कार्यक्रम नसून, संकटात सापडलेला बळीराजा एकटा नाही तर संपूर्ण कष्टकरी समाज त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास देण्याचा हा माणुसकीचा दीप असल्याचे काशिनाथ नखाते यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी कुटुंबांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. संकटाच्या काळात समाजाने एकमेकांना आधार दिला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आपल्या भावना व्यक्त करताना मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महेश स्वामी म्हणाले की, “ज्या बळीराजाच्या काबाडकष्टामुळे आपल्या ताटात अन्न येते, त्याच बळीराजाच्या घरात दिवाळीच्या दिवशी अंधार असेल तर आपल्या आनंदाला काहीच अर्थ उरत नाही. शेतकरी संकटात असताना त्याच्या मदतीला धावून जाणे ही कोणतीही दया नसून आपली नैतिक सामाजिक जबाबदारी आहे. जात, धर्म, भाषा आणि राजकीय पक्ष या सर्व भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाला साहाय्य करणे हाच खरा मानवतेचा धर्म आहे.”
या अनोख्या उपक्रमाला लातूर व धाराशिवमधील गावकऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त व भावूक प्रतिसाद दिला. मदत घेऊन आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी मोठ्या आपुलकीने स्वागत केले. तसेच त्यांच्यासाठी नाश्ता व भोजनाची अत्यंत प्रेमाने व्यवस्था केली. गावकऱ्यांच्या या प्रेमळ आदरातिथ्यामुळे मदत देण्यासाठी गेलेले सर्व पदाधिकारी भारावून गेले आणि त्यांनी गावकऱ्यांसोबत एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला.
कष्टकरी आणि बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा हा उपक्रम समाजमनात एक आदर्श वस्तुपाठ घालून देणारा ठरला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
