63
मिसिंग लिंक बोगद्यात भीषण रस्ता अपघात; वाकडचे युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू!
मुंबई/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील नवनिर्मित ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात आज पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रस्ता अपघात घडला. या अपघातात वाकड येथील प्रसिद्ध युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात कारमधील आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, इतर तिघे जण सुदैवाने सुरक्षित बचावले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उद्योजक तुषार भूमकर हे आपल्या फॉर्च्युनर कारने पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. पहाटे दीडच्या सुमारास मिसिंग लिंक बोगद्यातून जात असताना, बोगद्यातील दोन लेनवर काही वाहने उभी होती. त्यामुळे वेगात असलेल्या फॉर्च्युनर कारचे अचानक नियंत्रण सुटले आणि गाडीने समोरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच प्राण गेला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
युवा उद्योजक तुषार भूमकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाची बातमी पसरताच वाकडसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मोठा मित्रपरिवार आणि कुटुंब आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा वावर होता.
विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीने काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवर प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणूक लढवली होती. भूमकर कुटुंबावर ओढवलेल्या या भीषण आघातामुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यातील वाहतूक व्यवस्थापन, अचानक उभी राहणारी वाहने आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. बोगद्याच्या आत वाहने उभी राहणे आणि वेगावर मर्यादा नसणे यामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
