17
शालेय विद्यार्थ्यांनी जाणून घेतले अग्निसुरक्षेचे महत्त्व! मोशी अग्निशमन केंद्रात प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मोशी अग्निशमन केंद्र येथे ‘सिटी प्राईड स्कूल’ (मोशी) मधील विद्यार्थ्यांसाठी अग्निसुरक्षा साहित्य प्रदर्शन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या दैनंदिन कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. आग विझवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचा बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारी विविध आधुनिक उपकरणे, बचाव साहित्य, तसेच अग्निशमन वाहनांची वैशिष्ट्ये प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आली.
यावेळी जवानांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले, आग लागल्यास घाबरून न जाता घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे इमारतीबाहेर पडण्याचे मार्ग व पद्धती, प्राथमिक उपाययोजना आणि अग्निशमन दलाच्या ‘१०१’ या हेल्पलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधणे.

विद्यार्थ्यांनी मोशी अग्निशमन केंद्रातील वाहनांची पाहणी करत विविध साहित्याची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अग्निसुरक्षा आणि जवानांच्या कामगिरीबाबत विविध उत्सुकतापूर्ण प्रश्न विचारले, ज्यांची उत्तरे अग्निशमन जवानांनी सहजसोप्या भाषेत दिली.
या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षिततेची जाणीव अधिक दृढ झाली आहे. शालेय स्तरावरच अग्निसुरक्षेची संस्कृती रुजवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

