news
Home पिंपरी चिंचवड चिंचवडमध्ये ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषद’ संपन्न; माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांच्याकडून धोरणाचा तीव्र निषेध!

चिंचवडमध्ये ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषद’ संपन्न; माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांच्याकडून धोरणाचा तीव्र निषेध!

डॉ. सुहास कांबळे, मानव कांबळे व ॲड. विवेक भाई चव्हाण यांच्या उपस्थितीत बहुजन समाजाचा एल्गार; संविधानातील राज्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मागासवर्गीयांच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली जाती-जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न; ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदे’चा तीव्र विरोध: माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २९ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रज्ञा आणि अगाध ज्ञानाच्या बळावर संसदेच्या सभागृहावर मोठे प्रभुत्व निर्माण केले होते. या देशातील सर्व घटकांची आणि समाजाची पुनर्रचना करण्याचे महान कार्य डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केले. मात्र, सध्या मागासवर्गीयांच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात जाती-जातींमध्ये नाहक वाद निर्माण केले जात आहेत. बहुतांश समाजाचा या उपवर्गीकरणाला स्पष्ट विरोध असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत सरकार क्रिमिलेयरची अट लादण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. यामुळे मागासवर्गीय समाजामध्ये अंतर्गत वाद निर्माण होऊन फूट पडेल. म्हणूनच या धोरणाला ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदे’चा तीव्र विरोध आहे,” असे रोखठोक मत माजी आमदार व ज्येष्ठ नेते ॲड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदेत’ प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. जयदेव गायकवाड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ‘कोब्रा’चे ॲड. विवेक भाई चव्हाण, वसंत दादा साळवी, ॲड. अंबादास बनसोडे, प्रा. केशव वाघमारे, बाळासाहेब भागवत, देवेंद्र तायडे, कपिल सरोदे, ॲड. अरविंद तायडे, विवेक बनसोडे, सुरेश निकाळजे आणि बापू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वच नेत्यांनी परिषदेत सहभागी होऊन आरक्षण उपवर्गीकरणाच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत आपले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात ॲड. जयदेव गायकवाड पुढे म्हणाले की, “ज्ञान आणि शिक्षणाचे अलोट महत्त्व २०० वर्षांपूर्वीच क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी देशाला सांगितले होते. मुक्ता साळवे सारखी महिला केवळ ज्ञानाच्या आणि विचारांच्या बळावरच तत्कालीन ब्रिटिशांशी लढू शकली. आज आपल्याला जातींच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची नितांत गरज आहे. या देशाला एक मजबूत राष्ट्र म्हणून निर्माण करताना समतेचे तत्व अंगीकारून सर्वप्रथम जाती नष्ट केल्या पाहिजेत; कारण जाती नष्ट झाल्याशिवाय या देशातील विषमता कधीही संपणार नाही.”

संविधानाचा दाखला देत ॲड. गायकवाड यांनी स्पष्ट केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना ‘बॅकवर्ड’ (मागासलेला समाज) या शब्दाची कोणतीही एक साचेबद्ध व्याख्या केलेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीनुसार तिथला समाज मागासलेला असू शकतो. त्यामुळे कोणत्या घटकाला ‘बॅकवर्ड’ ठरवायचे, हा सर्वस्वी त्या-त्या राज्य सरकारचा घटनात्मक अधिकार आहे. उदाहरणादाखल, महाराष्ट्रात सध्या ५९ जाती बॅकवर्ड प्रवर्गात समाविष्ट आहेत, तर इतर राज्यांमध्ये हा आकडा आणि तिथल्या जाती पूर्णपणे वेगवेगळ्या असतील. असे असताना, केवळ एका विशिष्ट जातीच्या मागणीवरून सरसकट आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे सामाजिक न्यायाला धरून नाही. म्हणूनच या वर्गीकरणाच्या आणि क्रिमिलेयरच्या अटीला आमचा संघटित विरोध आहे.”

या परिषदेच्या यशस्वीतेसाठी मुख्य आयोजक म्हणून ईश्वर कांबळे, ॲड. मिलिंद कांबळे, राहुल सोनवणे, नितीन कांबळे, प्रकाश बुक्तर, विनोद सरोदे, ॲड. नीलध्वज माने, प्रमोद क्षीरसागर, सुरेश गायकवाड आणि विकास साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले व सक्रिय सहभाग नोंदवला. चिंचवड येथील या परिषदेला शहरातील बहुजन व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उपवर्गीकरणाच्या विरोधात ऐक्य दाखवले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

1 comment

आनंदा सखाराम कुदळे June 30, 2026 - 12:17 pm

2014 पासून आलेले बीजेपी सरकार प्रत्येक जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. ज्याप्रमाणे आता उप वर्गीकरण विषय सुरू आहे .त्याचप्रमाणे या अगोदरही ओबीसी मध्ये विविध जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न या बीजेपी सरकारने केलेले आहे .धनगर समाज यांना वेगळे आश्वासन देणे ,बारा बलुतेदारांना वेगळे आश्वासन देणे ,ओबीसी मधील पुढारलेल्या जाती ओबीसी मधून वगळण्यात येणार आहेत अशी अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले.ओबीसीच्या सर्व सवलती मराठा समाजास देणे. मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले.

Reply

Leave a Comment

error: Content is protected !!