30
‘फूड डिव्होर्स’ (Food Divorce) म्हणजे काय? जोडपी का वेगळे खरेदी करतात, स्वयंपाक करतात आणि जेवतात?
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि बदलत्या सवयींमुळे ‘फूड डिव्होर्स’ (Food Divorce) हा शब्द आणि ट्रेंड जगभरात चर्चेत आला आहे. मॅट्रो (Metro UK) या प्रसारमाध्यमाने पहिल्यांदा वापरलेला हा शब्द वैवाहिक अथवा कायदेशीर घटस्फोटाशी संबंधित नसून “नात्यातील वाद टाळण्यासाठी एकत्र न जेवता वेगळे स्वयंपाक करणे व जेवणे” या नव्या जीवनशैलीशी संबंधित आहे.
सिटी सेंट जॉर्जेस युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या फूड पॉलिसी सेंटरच्या रिसर्च फेलो डॉ. लैला फाथी (Dr Leila Fathi) यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ओझेंपिक’ (Ozempic) किंवा ‘माऊंजोरो’ (Mounjaro) यांसारख्या GLP-1 औषधामुळे लोकांचा अन्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. या औषधांच्या दुष्परिणामांमुळे उल्टी/मळमळ होणे किंवा अन्नावरील आवड कमी होणे, भूक मरणे अशा गोष्टी घडतात. त्यामुळे जोडप्यातील एक व्यक्ती औषधावर असल्यास दोघांच्या जेवण्याच्या वेळा आणि अन्नाच्या आवडी पूर्णपणे बदलतात.
आजकाल लोकांमध्ये डाएटबाबत जागरूकता वाढली आहे. एक व्यक्ती हाय-प्रोटीन (High Protein) किंवा केटो (Keto) डाएट पाळत असेल, तर दुसरी व्यक्ती सामान्य किंवा व्हेज/शाकाहारी जेवण पसंत करते. तसेच ग्लूटेन (Gluten) किंवा दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी (Lactose Intolerance) यामुळे एकाच घरात दोन वेगळे स्वयंपाक करावे लागतात.
कामाचे वेगवेगळे शिफ्ट्स आणि कामाचा ताण यामुळे जोडप्यांना एकत्र बसून जेवायला वेळ मिळत नाही. ‘आज रात्री काय खायचे?’ या साध्या प्रश्नावरून होणारे वाद व डोकेदुखी टाळण्यासाठी दोघेही आपापल्या आवडीनुसार जेवण ऑर्डर करतात किंवा बनवतात.
दररोज “काय बनवायचे?” किंवा “काय खायचे?” यावरून होणारे खटके टाळण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरत असल्याचे काही जोडप्यांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, एकत्र बसून जेवणे हा कुटुंबातील संवादाचा आणि एकत्र वेळ घालवण्याचा महत्त्वाचा भाग असतो. फूड डिव्होर्समुळे एकत्र वेळ घालवण्याची सवय सुटल्यास जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचा धोकाही असतो.
थोडक्यात सांगायचे तर, ‘फूड डिव्होर्स’ हा घटस्फोट नसून अन्नावरून होणारे वाद टाळून नात्यात शांतता राखण्यासाठी जोडप्यांनी शोधलेला एक व्यावहारिक मार्ग आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
