20
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वाघोलीत नशाबंदी प्रदर्शन अन् व्यसनमुक्तीची शपथ; महिलांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन , दि. १२ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
वाघोली: नवरात्रीच्या पहिल्या पावन दिवसाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील वाघोली येथे ‘नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (जिल्हा अमरावती)’ व विविध समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नशाबंदी प्रदर्शनी व व्यसनमुक्ती शपथ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तंबाखू, गुटखा, दारू यांसारख्या विविध व्यसनांमुळे आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावर होणाऱ्या घातक परिणामांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या माला तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, नशाबंदी मंडळाचे अमरावती जिल्हा संघटक प्रफुल्ल मंदा श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाघोलीचे सरपंच आकाश तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा प्रधानसचिव विजय डवरे, जिल्हाकार्यवाह व वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभागाचे नरेंद्र धर्माळे, समितीचे सदस्य संजय खापरे, तसेच वाघोलीतील सामाजिक कार्यकर्त्या विजया माहोरे आणि शिला तायवाडे यांच्यासह गावातील नागरिक, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नशाबंदी प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेमुळे कुटुंबांचे होणारे आर्थिक नुकसान, महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार आणि तरुणांच्या भविष्यावर होणारे विपरीत परिणाम यांवर प्रभावीपणे प्रकाश टाकण्यात आला.
“व्यसनमुक्ती ही केवळ एका व्यक्तीची जबाबदारी नसून संपूर्ण समाज आणि कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे. व्यसनमुक्त कुटुंब आणि निरोगी समाज हीच सक्षम गावाची खरी ओळख आहे,” असा संदेश या वेळी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी दिला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थितांनी स्वत: व्यसनांपासून दूर राहण्याची, कुटुंबातील सदस्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्याची आणि वाघोली गाव पूर्णपणे व्यसनमुक्त करण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची सामूहिक शपथ घेतली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महिलांचा मोठा सहभाग आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS. सर्व हक्क राखीव.
