3
कारमधून ५० लाखांची रोकड पळवणारे मित्र अवघ्या ८ तासांत गजाआड; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडक कारवाई!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: कारमधून ५० लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा (युनिट-२), मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने अवघ्या ८ तासांच्या आत शिताफीने अटक केली आहे. चोरीस गेलेली ५० लाख रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.अटक करण्यात आलेले आरोपी चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, रा. निघोजे, बेंडाले वस्ती, ता. खेड, जि. पुणे – व्यवसाय: बांधकाम), प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे – व्यवसाय: सुपरवायझर).
गुरुवारी (०९ ऑक्टोबर २०२६) रात्री १०:५० ते १२:१५ वाजेदरम्यान पुनावळे येथील ‘संदीप हॉटेल’समोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर पार्क केलेल्या एका कारचे लॉक बनावट चावीने उघडून कारमधील ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता (गु.र.नं. ४७६/२०२६). घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले.
अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) प्रदीप जाधव, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजची बारीक तपासणी केली. फुटेजमध्ये एक इसम बनावट चावीने कार उघडून बॅग घेऊन जाताना स्पष्ट दिसला.
पोलीस पथकाने अधिक कौशल्याने तपास केला असता, फिर्यादीसोबत मुंबई येथून पैसे आणण्यासाठी गेलेला त्याचा साथीदार चारुदत्त बेंडाले याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यानेच आपल्या कारची बनावट चावी त्याचा मित्र प्रसाद बनकर याला देऊन कारमध्ये ५० लाख रुपये असल्याचे सांगत चोरी करायला लावल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तत्काळ चिंबळी येथून प्रसाद बनकर याला ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून चोरीला गेलेली ५० लाख रुपयांची सर्व रक्कम हस्तगत करण्यात आली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे साो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड सो, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. श्री. रोहिदास पवार, पोउपआ परिमंडळ-०२, श्री प्रदिप जाधय, सपोआ, गुन्हे-१ मा. श्री. सुदर्शन राठोड, सपोआ, वाकड विभाग, सुनिल कुन्हाडे यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-२ चे वपोनि संदिप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वपोनि संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वपोनि रुषिकेश घाडगे, पोउपनि मयुरेश साळुंखे, पोउपनि राहुल खिळे, पोहया/विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, गोविंद चव्हाण, आशिष बोटके, पोशि/गणेश सावंत, विनोद विर, शामसुंदर गुट्टे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोशि/रमेश कारके यांनी केली आहे
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
