3
स्पा सेंटर चालकाकडे ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १० ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: रहाटणी येथील स्पा सेंटर चालवण्यास परवानगी देण्यासाठी आणि वृत्तपत्रात बातम्या न छापण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका पत्रकाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना आरोपीला जगताप डेअरी चौकात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. अक्षय अरुण वाघमारे (वय ३५, रा. ३८ औंध रोड, भाऊ पाटील, पाडळेवस्ती, खडकी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव असून, तो ‘साप्ताहिक वंचित सामना’चा पत्रकार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद मन्सुर पेंढारी (वय २७, सध्या रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांचे रहाटणी येथे ‘अर्थ स्पा सेंटर’ आहे. आरोपी पत्रकार अक्षय वाघमारे याने या स्पा सेंटरबद्दल पोलिसांच्या डायल ११२ क्रमांकावर खोटी माहिती देऊन पोलिसांना बोलावून स्पा चालकाला मानसिक त्रास दिला.
त्यानंतर, स्पा सेंटर सुरळीत चालवायचे असल्यास ५० हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल; अन्यथा वृत्तपत्रात खोट्या बातम्या छापून व्यवसाय बंद पाडण्याची आणि जास्त नाटक केल्यास “खल्लास करून टाकीन” अशी थेट धमकी दिली होती.
स्पा चालक साजिद पेंढारी यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची पडताळणी केली. खंडणीची मागणी सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी (९ ऑक्टोबर २०२६) रहाटणी येथील साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक येथे दोन पंचांसमक्ष सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना आरोपी अक्षय वाघमारे याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेला मुद्देमाल रोख रक्कम १०,००० रुपये, एक आयफोन/मोबाईल, ‘वंचित सामना’चे पत्रकार ओळखपत्र (ID Card), गुन्ह्यात वापरलेली होंडा कंपनीची कार (एकूण किंमत: ₹२,७७,५००)
आरोपीविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६२२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, आणि सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पो.उ.नि. रमेश गायकवाड, पोलीस अमलबार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडाबे, रमेश मावसकर, किशोर कांबळे व दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
